no images were found
कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होवून त्यांना पाठींबा दिला. ही आम्हा शिवसैनिकांची बंडखोरी नसून, शिवसेना संपवायला निघालेल्या महाविकास आघाडीतील मित्र पक्षांविरोधातील असंतोष आणि उठाव आहे. आम्ही घेतलेल्या भूमिकेनंतर राज्यात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.
दर दहा ते पंधरा वर्षांनी शिवसेनेत अशी परिस्थिती का निर्माण होते याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. शिवसेना पक्षवाढीसाठी जीवाचे रान केलेले शिवसैनिक उठावाची भूमिका का घेतात? याचा पक्षनेतृत्वाने कुटुंबप्रमुख म्हणून विचार करणे गरजेचे आहे.
सन २००५ ला काही दिग्गज नेते शिवसेना सोडून गेल्यानंतर शिवसेना संपली असे बोलले जात होते. पण वंदनीय शिवसेनाप्रमुखांच्या आदेशाने राज्यातील तमाम शिवसैनिकांनी शिवसेनेचे नुसते अस्तित्व जपले नाही तर शिवसेना इतर पक्षांचे प्राबल्य मोडीत काढत पुढे आली. कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता २००९ साली कोल्हापूर जिल्ह्यातून शिवसेनेचे ३ आमदार निवडून आले. तत्कालीन सत्ताधारी कॉंग्रेस – राष्ट्रवादी विरोधात लोकांचे प्रश्न सोडविण्याची धमक आणि जनसेवा अखंडित ठेवल्यानेच २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेचे ६ आमदार निवडून आले. परंतु, २०१४ ते २०१९ च्या युती सरकारच्या काळात कोल्हापूर जिल्ह्याला शिवसेनेकडून मंत्री पद मिळाले नाही. यामुळे २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेची वाताहात झाली. माझ्यासह शिवसेनेचे एकूण ५ विद्यमान सदस्य पराभूत झाले. त्याचवेळी कोल्हापूर जिल्ह्यास शिवसेनेकडून मंत्री पदाची संधी दिली गेली असती तर परिस्थिती वेगळी दिसली असती.
मंत्री पदाने हुलकावणी दिली म्हणून नाराज न होता पक्ष आदेशांनुसार आलेल्या आदेशाचे पालन करीत राहिलो. सन २०१९ च्या पराभवानंतरही सन्मानीय पक्षप्रमुखांनी माझ्याकडे असलेले राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष पद कायम ठेवले. महाराष्ट्राच्या राजकारणात रिमोट
कंट्रोलची भूमिका “मातोश्री” ने बजावली आहे.शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे आमचे दैवत आहेत. तर मुख्यमंत्री यांचे जनसेवेचे काम पाहून आपण त्यांना गुरु मानल आहे. त्यांच्या माध्यमातून होणारी आरोग्य सेवेची कामे, विकासाची कामे, मुंबई नंतर ठाणे जिल्ह्याचा झालेला विकास आदींचा विचार करता त्यांच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्याचा विकास करण्याचे ध्येय शिवसेनाप्रमुखांचे खरे हिंदुत्ववादी विचारांची जपणूक उराशी बाळगूनच आपण मुख्यमंत्री यांच्या गटात सामील झालो.आजपर्यंत कुठल्या नगरविकास मंत्र्याला रस्त्यावर उतरून रस्ते स्वच्छ करताना पाहिलंय? गडचिरोलीसारख्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मागून घेतलं आणि जिल्ह्यात विकासकामे सुरू केली. नक्षलवादी विरोधी पोलिसी कारवायांना बळ दिलं. हे सगळं त्यांनी व्यक्तिगत स्वार्थासाठी नाही केलं. शिवसेनेसाठी केलं. उद्धवसाहेबांसाठी केलं. महाराष्ट्राच्या जनतेसाठी केलं.कोल्हापूर शहराची हद्दवाढ, श्री अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास, ऐतिहासिक गड किल्ले, पुरातन मंदिरांचा विकास, रस्ते, मुलभूत सोई सुविधा आदींबाबत मुख्यमंत्री महोदयांनी यापूर्वीच लक्ष घातले असून ते याबाबत ते सकारात्मक आहेत.ज्यावेळी एका पक्षातील दोन तृतीअंश आमदार स्वतंत्र गट स्थापन करतात तेंव्हा त्याला कायदेशीर मान्यता मिळत असते. दोन तृतीअंश आमदारांनी असा गट स्थापन केल्यास त्याला गद्दारी म्हणता येत नाही. विकासाच व्हिजन आणि वंदनीय शिवसेनाप्रमुखांचे हिंदुत्व जोपासण्या साठीच आम्ही यांच्यासमवेत आहोत. आम्ही कालही शिवसैनिक होतो आणि आजही शिवसैनिकच आहोत. शिवसेनापक्षप्रमुखांचा प्रत्येक आदेश आजपर्यंत शिरसावंद्य ठेवला होता. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत विजयाची संधी असतानाही मातोश्री चा आदेश अंतिम मानून आयुष्यात पहिल्यांदा अंतकरणावर दगड ठेवून कॉंग्रेसच्या चिन्हा वर मतदान केले, कॉंग्रेस उमेदवाराचा प्रचार करून निवडून आणण्यात अग्रभागी राहिलो, वंदनीय शिवसेनाप्रमुखांच्या कॉंग्रेस विरोधी विचारांचा एक कट्टर शिवसैनिक म्हणून यापेक्षा मोठे दुर्दैव नाही.