
no images were found
सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचा समारोप : भारतासह २३ देशांतील ३० हजार हिंदूंचा सहभाग
फोंडा, गोवा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेनगरी) – संत-गुरुजन नेहमी सांगायचे, ‘आगामी काळ युद्धाचा आहे. त्या युद्धात विजय मिळवण्यासाठी, ते युद्ध लढण्यासाठी प्रत्येक हिंदूने तयार होण्याची आवश्यकता आहे.’ पहेलगामच्या हल्ल्यात धर्म विचारून माणसे मारली गेली. पूर्वीही औरंगजेब असो, अकबर असो किंवा इतर अनेक शत्रूंनी हिंदूंचे नाव विचारून, धर्म विचारून त्यांचे धर्मांतर केले. जे धर्मांतर करत नव्हते, त्यांना मारले गेले. आज त्याचेच बिघडलेले वंशज त्यांच्याच मार्गदर्शनावर चालत आहेत. अशा प्रवृत्तीचे लोक केवळ पहेलगाममध्येच नाही, तर प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्ह्यात लपलेले असू शकतात. त्यामुळे हिंदूंनी आपल्या मुलांना स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण द्यायला हवे. जो लढेल तोच वाचेल. जो लढणार नाही त्यांच्यासाठी येणारा काळ खूप कठिण आहे. त्यामुळे येथून जाण्यापूर्वी समस्त हिंदूंनी एक असा संकल्प घ्या की, आगामी काळात भारताला हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी आवश्यक ते प्रत्येक पाऊल उचलू आणि संघटितपणे राहू, असे आवाहन तेलंगणा येथील भाजपचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार श्री. टी. राजासिंह यांनी केले. ते ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त बोलत होते.
गोव्याच्या पवित्र भूमीत ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेनगरी’ येथे सुरू असलेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चा भव्य आणि भक्तिमय समारोप झाला. भारतासह जगभरातील २३ देशांतून आलेले सुमारे ३० हजार हिंदू धर्मप्रेमी आणि साधक यांनी महोत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून हिंदु एकात्मतेचे दर्शन घडवले. हा महोत्सव म्हणजे हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दिशेने पडलेले एक महत्त्वाचे पाऊल होते.
या महोत्सवात विविध आध्यात्मिक, राष्ट्रहितकारी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महत्त्वाचे म्हणजे भारताच्या विजयासाठी, तसेच भारतीय सैन्य, सनातन धर्मप्रेमी आणि राष्ट्ररक्षण यांसाठी आयोजित शतचंडी यज्ञ, तर समस्त सनातन हिंदु धर्मियांसाठी चांगले आरोग्य लाभो यासाठी महाधन्वंतरी यज्ञ भावपूर्णरित्या पार पडला. यासाठी तामिळनाडू येथून ३५ पुरोहित आले होते.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या शुभहस्ते ‘सनातन धर्मध्वजा’चे जयघोषात आरोहण करण्यात आले. या महोत्सवात देशभरात राष्ट्र अन् धर्म कार्य करणार्या २५ राष्ट्र अन् धर्म निष्ठ व्यक्तींना ‘हिंदु राष्ट्ररत्न’ आणि ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हे पुरस्कार आता दरवर्षी दिले जाणार आहेत.
महोत्सवात प्रसिद्ध कीर्तनकार श्री. चारुदत्त आफळे यांनी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा जीवनपट कीर्तनाच्या माध्यमातून भावपूर्णरित्या उलगडला. यातून राष्ट्रगुरु कसे असतात, त्यांचे कार्य कसे असते आणि त्यातून समाज धर्मप्रवण कसा होतो हे लोकांसमोर मांडले. गोव्याच्या संस्कृतीचे पारंपारिक नृत्य, गुरुवंदना गीत, सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच धर्मशिक्षण आणि साधनासंवर्धनासाठी ग्रंथप्रदर्शनांचा हजारो भाविकांनी लाभ घेतला.
या महोत्सवात श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरिजी, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष पू. महंत रविंद्र पुरीजी महाराज, अयोध्या हनुमानगढी येथील पू. महंत राजू दास, श्रीक्षेत्र तपोभूमी (कुंडई, गोवा) पिठाधीश्वर पद्मश्री सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी, ‘सनातन बोर्ड’चे प्रणेते पूज्यश्री देवकीनंदन ठाकूरजी महाराज, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपादजी नाईक, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोदजी सावंत, माजी केंद्रीय माहिती आयुक्त श्री. उदय माहुरकर, तसेच काशी-मथुरा येथील मंदिरांचा खटला लढवणारे सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता विष्णु शंकर जैन आदी अनेक मान्यवर वक्त्यांनी अध्यात्म, राष्ट्र आणि धर्म आदी विविध विषयांवर हजारो हिंदूंचे प्रबोधन केले. एकूणच या महोत्सवातून सर्वांना राष्ट्रधर्माचे कार्य करण्यासाठी आध्यात्मिक, वैचारिक आणि शारीरिक बळ मिळाले आहे.