no images were found
ड्रॅगन पाळण्याची ट्रॉली १० फुटांवरुन कोसळून ५ जखमी
कोल्हापूर : पट्टण कोडोली येथे यात्रेत अचानक पाळणा तुटून पाच जण जखमी झाल्याची घटना घडली. ड्रॅगन रेल्वे पाळण्याचा मागील डबा तुटून 10 फुटांवरुन खाली जमिनीवर कोसळला. यामध्ये एका महिलेच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली तर अन्य चौघे किरकोळ जखमी झाले.
सध्या कोल्हापुरातील पट्टण कोडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रा सुरु आहे. येथे विठ्ठल-बिरदेवाचे प्राचीन मंदिर आहे. पट्टणकोडोली गावचे बिरोबा हे कुलदैवत असून गावात दरवर्षी श्री विठ्ठल-बिरदेवाची यात्रा भरत असते. कोरोनामुळे गेली २ वर्षे यात्रा मानऱ्याच्या उपस्थितीत पार पडली होती. यात्रेसाठी महाराष्ट्रातील विविध ठिकाणहून लाखो भाविक यात्रेसाठी येतात. भंडाऱ्याची उधळण केली जाते. कोरोना संसर्ग कमी झाल्याने यावर्षी यात्रेस उत्साहात प्रारंभ झाला.
दरम्यान या यात्रेमध्ये विविध खाद्य पदार्थ, खेळणी यांचे स्टॉल्स तसेच उंच उंच पाळणे उभारण्यात आले आहेत. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. रविवारी रात्री 10 वाजणेच्या सुमारास तेथे असलेल्या ड्रॅगन रेल्वेचा एक डब्बा सुमारे 10 फुटांवरून अचानक निसटून खाली कोसळला.
डबा कोसळल्यामुळे झालेल्या आवाजाने परिसरात एकच खळबळ माजली. या दुर्घटनेत एकूण 5 जण जखमी झाले असून यामध्ये सिद्धव्वा हनमट्टी (वय 16), करेवा दंडापुरे (वय 27), अशोक दंडापुरे (वय 33), मलकैज हनिमनुट्टी (वय 24), प्रितम अशोक दंडापुरे (वय 5) जखमी झाले. हे सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत.
सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र ड्रॅगन रेल्वे पाळण्याचा मागील डबा तुटून 10 फुटांवरुन खाली जमिनीवर कोसळल्याने ५ जणांना मार लागून जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तात्काळ आरोग्य केंद्रात नेण्यात आले होते. मात्र या घटनेमुळे या उंच व वेगवान पाळण्याचा सुरक्षेबाबत करण्यात आलेल्या उपाय योजने संदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे.