
no images were found
‘वीर हनुमान’च्या कलाकारांनी बजरंगबलीशी असलेले आपले नाते शेअर केले
सोनी सबवरील वीर हनुमान मालिका हनुमानाच्या बालपणीच्या फारशा न ऐकलेल्या कथा सादर करून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. या मालिकेत बाल मारुतीच्या असामान्य कथा दाखवल्या आहेत. हा त्याच्या खट्याळपणापासून ते स्वतःच्या असामान्य शक्ती ओळखण्यापर्यंतचा प्रवास आहे. सध्या सुरू असलेल्या कथानकात हनुमानाला वेगवेगळ्या देवतांकडून वेगवेगळी वरदाने मिळाल्याचे दाखवले आहे. या मालिकेत आन तिवारीने छोट्या हनुमानाची भूमिका करून त्याच्या खोड्या, भावनिक संघर्ष, आध्यात्मिक लढा सुंदर प्रकारे साकारला आहे. सायली साळुंखे आणि आरव चौधरी या कलाकारांनी हनुमनाच्या माता-पित्याची म्हणजे अनुक्रमे अंजनी आणि केसरीची भूमिका केली आहे. माहिर पांधी या अभिनेत्याने वाली आणि सुग्रीव यांची दुहेरी भूमिका साकारली आहे. भगवान महादेवाच्या भूमिकेत तरुण खन्ना दिसत आहे.
हनुमान जयंती म्हणजे शक्ती, युक्ती आणि परम भक्तीचे प्रतीक असणाऱ्या रामभक्त हनुमानाचा जन्म दिवस. हा दिवस देशभरात अत्यंत उत्साहाने आणि भक्तीभावाने साजरा केला जातो. ‘जय बजरंगबली’च्या जयघोषाने वातावरण दुमदुमून जाते. लोक हनुमनाच्या मंदिरात जाऊन हनुमान चालीसाचे पठण करतात. या मंगलदिनी ‘वीर हनुमान’च्या कलाकारांनी या पर्वाशी निगडीत आपल्या आठवणी आणि विचार शेअर केले.
महाबली केसरीची भूमिका करणारा आरव चौधरी म्हणतो, “हनुमान जयंती हे शक्ती, भक्ती आणि मूल्यांचे प्रतीक आहे, हे गुण आपण आपल्या पुढच्या पिढीला देणे अत्यंत गरजेचे आहे. ‘वीर हनुमान’ सारख्या मालिकेत सध्या काम करत असल्यामुळे या दिवसाचे मला विशेष महत्त्व वाटते आहे. मारुतीच्या वडिलांची भूमिका मिळणे आणि भारतीयांचे दैवत असलेल्या हनुमानाच्या भव्य मालिकेत काम करण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य आहे.”
माता अंजनीची भूमिका करणारी सायली साळुंखे म्हणते, “ हनुमान जयंती एक सुंदर, आध्यात्मिक ऊर्जा घेऊन येते. मी हनुमानाची भक्त असल्यामुळे या दिवशीच्या सोहळ्यात मी पार गुंतून जाते. घरी आम्ही हनुमान चालीसा म्हणतो आणि नैवेद्य दाखवून हा सण साजरा करतो. या भूमिकेमुळे हनुमानाशी माझे नाते आणखी भावनिक आणि भक्तीपूर्ण झाले आहे.”
वाली आणि सुग्रीव यांची दुहेरी भूमिका साकारणारा माहिर पांधी म्हणतो, “वीर हनुमान मालिकेत वाली आणि सुग्रीव या दोन बलाढ्य वीरांची भूमिका करण्याचा अनुभव जबरदस्त आहे. विशेषतः त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील भेद दाखवणे आव्हानात्मक आहे. हनुमान जयंती हा हिंमत, निष्ठा आणि श्रद्धा या गुणांचा सोहळा आहे. या गुणांनी हनुमानाचे वर्णन होऊ शकते. या दिवसाचा संबंध आंतरिक ताकदीशी आणि अंतर्मुख होण्याशी आहे. या वर्षी, हनुमान जयंतीच्या पवित्र काळात या मालिकेत काम करत असल्याचा खूप आनंद आणि अभिमान वाटतो आहे.”
महादेवाची भूमिका करणारा अभिनेता तरुण खन्ना म्हणतो, “या मालिकेत महादेवाची भूमिका करण्याला एक दिव्यत्वाचा स्पर्श आहे. कारण महादेवाचा एक परम भक्त हनुमान हा या मालिकेचा नायक आहे. हनुमान जयंती हे निःस्वार्थ सेवा आणि शक्तीचे प्रतीक आहे. या मंगल दिवशी प्रेक्षकांनी या मूल्यांबद्दल विचार करून त्यातून बोध घ्यावा अशी मी त्यांना विनंती करेन. ‘वीर हनुमान’ मालिकेत काम करताना मला हनुमानाच्या भक्तीची परिसीमा उमगते आहे. जी मला पडद्यावर आणि पडद्याच्या मागे देखील प्रेरणादायक ठरत आहे.”