
no images were found
वागले की दुनिया’ मध्ये एका अनोख्या तिहेरी भूमिकेत परेश गणात्रा
सोनी सबवरील ‘वागले की दुनिया: नई पीढी नए किस्से’ मालिकेत दाखवलेल्या मध्यमवर्गाचे दैनंदिन संघर्ष आणि त्यांच्यातील हृदयस्पर्शी क्षण पाहून ग्राहक त्या कथानकात गुंतून जातात. मालिकेतील धमाल वाढवण्यासाठी, परेश गणात्रा हा जेष्ठ विनोदी नट एका खास भूमिकेत या मालिकेत दिसणार आहे. ज्योती (भक्ती चौहान) च्या सुधांशु, हिमांशु आणि दीपांशु या तिळ्या भावांच्या भूमिकेत येऊन तो मालिकेची रंगत तिपटीने वाढवणार आहे.
मालिकेतील आगामी कथानक प्रेक्षकांना जुन्या आठवणींची सैर घडवणार आहे. होते असे, की राजेश (सुमित राघवन), वंदना (परिवा प्रणती), अथर्व (शीहान कपाही) आणि सखी (चिन्मयी साळवी) यांना भूतकाळात राजेशने केलेल्या एका घोटाळ्याची आठवण होते. त्याने एक लग्न जुळवण्याचा विफल प्रयत्न केलेला असतो. वागले कुटुंबियांना आठवते की त्यावेळी राजेशने वंदनाची मैत्रीण संध्याचे लग्न डॉ. सुधांशु या कार्डियाक सर्जनशी जुळवण्याचा खटाटोप केला होता. त्यावेळी काही तरी गोंधळ होतो आणि संध्या सुधांशु ऐवजी चुकून त्याच्या दोन अगदी वेगळ्या प्रकृतीच्या भावांना भेटते. त्यापैकी हिमांशु खूप उग्र स्वभावाचा असतो, तर दीपांशु फारच हळव्या स्वभावाचा असतो. या गोंधळातून ‘कॉमेडी ऑफ एरर्स’ उद्भवते, जी पाहताना प्रेक्षकांची हसून हसून पुरेवाट होईल.
सुधांशु, हिमांशु आणि दीपांशु या तीन भिन्न भिन्न स्वभावाच्या भावांची भूमिका करणारा परेश गणात्रा म्हणतो, “वागले की दुनिया अशी मालिका आहे, जिच्यात वास्तवदर्शी कथानक हलक्या फुलक्या क्षणांनी फुलवले जाते. त्यामुळे या मालिकेत काम करण्याची संधी मला मिळाली, तेव्हा मला खूप आनंद झाला. एकाच वेळी तीन वेगवेगळ्या भूमिका करणे हे आव्हानात्मक तर खरेच, पण मी ते आनंदाने केले. या मालिकेतील कलाकारांसोबत काम करण्याचा आणि सुधांशु, हिमांशु आणि दीपांशु या व्यक्तिरेखा जिवंत करण्याचा माझा अनुभव खूप छान होता. मला आशा आहे की, हा गोंधळ पडद्यावर साकारताना मला जितकी मजा आली तितकीच मजा प्रेक्षकांना हा गोंधळ बघताना येईल.”
राजेश वागलेची भूमिका करत असलेला सुमित राघवन म्हणतो, “परेश एक सुपरिचित आणि लोकप्रिय कलाकार आहे. त्याचे विनोदाचे टायमिंग तर अफलातून आहेच पण त्याहीपेक्षा तो एक उमदा माणूस आहे. त्याच्यासोबत काम करताना फारच मजा आली. मुळात हे कथानक अगदी आगळेवेगळे आहे. त्यामध्ये तिळ्यांनी उडवलेली धमाल आहेच शिवाय फ्लॅशबॅकचा वापर केल्यामुळे स्मृतीरंजन देखील होते. राजेश आणि वंदना आपल्या भूतकाळातील गोष्ट आपल्या मुलांना सांगताना दिसतात. त्यामुळे हे कथानक म्हणजे विनोद आणि आत्मीयता यांचे सुंदर मिश्रण आहे. मला खात्री आहे की, प्रेक्षकांना ही गोष्ट खूप आवडेल.”