
no images were found
डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये ‘एआयएमए’ स्टुडंट चॅप्टरचा शुभारंभ
कोल्हापूर(प्रतिनिधी):-डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटने देशातील प्रमुख व्यावसायिक व्यवस्थापन संस्था ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनचे (एआयएमए) सदस्यत्व स्वीकारले असून महाविद्यालयात ‘एआयएमए’च्या स्टुडंट चॅप्टरचा शुभारंभ करण्यात आला. यामुळे व्यवस्थापन शिक्षणाला अधिक चालना मिळणार असून आणि उद्योग-शैक्षणिक सहकार्याला प्रोत्साहन मिळणार आहे.
यश ग्रुप कोल्हापूरच्या कार्यकारी संचालिका राजश्री सप्रे (जाधव) यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘एआयएमए’च्या स्टुडंट चॅप्टरचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचे संचालक डॉ. अजित पाटील, एमबीए विभाग प्रमुख डॉ. आसावरी यादव, प्रथम वर्ष विभागप्रमुख प्रा. अभिजीत मटकर, डेप्युटी रजिस्ट्रार प्रा. आश्विन देसाई यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी राजश्री सप्रे (जाधव) यांनी उद्योजकीय मानसिकता आणि व्यवसायातील नवोपक्रम याबद्दल मार्गदर्शन केले. कोल्हापूर जिल्ह्यातील फाउंड्री आणि मशीन शॉप उद्योगातील व्यवसाय संधींबद्दल त्यांनी माहिती दिली. विद्यार्थ्यांनी नवीन नवीन गोष्टी आत्मसात करव्यात, आत्मविश्वासाने बोलावे, स्वतःला बंदिस्त करून न घेता उद्योजकतेची कास धरावी असे आवाहन त्यांनी केले. भारतातील व परदेशातील शिक्षणामधील फरकही त्यांनी विषद केला.
कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी विद्यापीठ व कॉलेज घेत असणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती दिली.
डॉ. अजित पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या डिस्ट्रप्टीव टेक्नॉलॉजीमुळे होणाऱ्या बदलांचा कानोसा घेऊन आपल्यामध्ये बदल करावेत. कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.