
no images were found
‘वीर हनुमान’ मालिकेत मारुतीची सूर्याकडे धाडसी झेप-
बाल हनुमानाच्या सुरस कथा सादर करून सोनी सबवरील ‘वीर हनुमान’ मालिकेने प्रेक्षकांना भक्तीरसात गुंतवून ठेवले आहे. खोडकर मारुतीचे महावीर हनुमानात रूपांतर होण्याची कथा विशद करणाऱ्या या मालिकेच्या कथाभागात मारुतीची निरागसता, हिंमत आणि दिव्य नियती यांचे हृद्य मिश्रण दिसते. या मालिकेत छोट्या मारुतीची भूमिका केली आहे, आन तिवारीने, तर केसरी आणि अंजनी या भूमिका साकारल्या आहेत अनुक्रमे आरव चौधरी आणि सायली साळुंखे या कलाकारांनी. वाली आणि सुग्रीव अशी दुहेरी भूमिका करत आहे माहिर पांधी. वीर हनुमान मालिका सोमवार ते शनिवार रात्री 7:30 वाजता प्रसारित होते.
अलीकडच्या भागांमध्ये प्रेक्षकांनी मारुतीचे बाल-सुलभ कुतूहल पाहिले. या कुतुहलापोटीच तो महालाच्या भिंतींच्या बाहेर येतो. भूक आणि अदम्य ऊर्जा यांनी त्याचे शरीर सळसळते आहे. त्याला एका टोपलीत पिकलेले आंबे ठेवलेले दिसतात आणि त्याच्या डोक्यात एक धाडस करण्याची खुमखुमी येते. पण त्याची भूक सर्वसामान्य नाही. त्याचे लक्ष आकाशात उगवणाऱ्या लाल भडक तेजस्वी सूर्याकडे जाते आणि त्याला वाटते की हे सर्वात सुंदर असे रसाळ फळ असावे. हे फळ मिळवण्यासाठी तो पृथ्वीवरून आकाशाकडे झेप घेतो. या मार्गात त्याला शक्तीशाली जटायू (भीमराज मालाजी) आणि राहू (सौरभ कौशिक) सहित विविध शक्तीशाली देवता भेटतात व त्यांच्यात थरारक सामना होतो. सूर्याला गिळण्यासाठी मारुतीने घेतलेली ही झेप पाहून साक्षात देव देखील भयभीत होतात.
पण सूर्याला गिळून सौर मंडल विस्कळित करणाऱ्या मारुतीला देव थांबवू शकतील का? की बाल हनुमानाच्या या दिव्य खोडीमुळे सर्वत्र गोंधळ माजेल?
वीर हनुमान मालिकेत अंजनीची भूमिका करणारी सायली साळुंखे म्हणते, “मारुतीच्या प्रवासात त्याच्यातील प्रचंड कुतूहल, निरागसता आणि अदम्य ऊर्जा यांचे चित्रण आहे. आपल्या खेळकर स्वभावाने प्रेरित होऊन तो एक अनपेक्षित साहस करतो. सूर्य हे एक सोनेरी, रसाळ फळ आहे असे वाटून त्याच्या बालसुलभ भुकेचे अचानक एका असामान्य प्रवासात रूपांतर होते. या कथेत मारुतीची अदम्य ऊर्जा आणि बालसुलभ कुतूहल दिसते. मला खात्री आहे की, साहस आणि भावनांनी ओतप्रोत असलेली ही कथा बघायला प्रेक्षकांना खूप आवडेल.”