
no images were found
एआयची भीती नको, नवी कौशल्ये शिका -‘ निधीशदास थावरत
कोल्हापूर (प्रतिनिधी):-ए. आय. मुळे (कृत्रिम बुद्धीमत्ता) भविष्यात नोकऱ्या जातील अशी भीती बाळगू नका. उलट मोठ्या संधीही निर्माण होतील. त्यामुळे नवी कौशल्ये, तंत्रज्ञान आत्मसात करा, संशोधनावर भर द्या. हॅकेथॉन सारख्या स्पर्धेतून नवकल्पनांना चालना मिळून स्टार्टअप व नव्या कंपन्यांची निर्मिती होईल असा विश्वास हैदराबाद येथील ‘फारमिस्टा’ चे को – फाउंडर अँड चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर निधीशदास थावरत यांनी व्यक्त केला.
डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या डाटा सायन्स विभागाच्यावतीने आयोजित ‘द ग्रेट निंजा हॅक’ स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. या स्पर्धेत हैदराबाद (तेलंगणा)येथील वर्धमान कॉलेज ऑफ इंजिनियरिंगने या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला असून पुण्याच्या सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे द्वितीय तर कोल्हापूरच्या डी. वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संघाने तृतीय स्थान मिळवले.
डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या डाटा सायन्स विभागाच्यावतीने आयोजित ‘द ग्रेट निंजा हॅक’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्राचार्य डॉ. एस.डी. चेडे, रजिस्ट्रार डॉ. लीतेश मालदे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. स्पर्धेत महाराष्ट्रसह तेलंगणा, तमिळनाडू , कर्नाटक, गुजरात आदी राज्यातून ४६ संघ सहभागी झाले आहेत. यांच्यातील पहिल्या तीन क्रमांकाना रोख रक्कम आणि पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.
डाटा सायन्स विभाग प्रमुख डॉ. जी. व्ही. पाटील यांनी प्रास्ताविकामध्ये स्पर्धेचा उद्देश व रूपरेषा मांडली.
प्राचार्य डॉ. एस.डी. चेडे म्हणाले, प्रत्येक क्षेत्रात आव्हाने असून त्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःला सक्षम करणे गरजेचे आहे. माहिती आणि ज्ञान यामध्ये फरक आहे. ज्ञान मिळवण्यासाठी जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे. अशा स्पर्धांमधून ज्ञान, संशोधनासाठी मोठा फायदा होतो.
विद्यार्थी समन्वयक आर्यमन देसाई यांनी, हॅकेथॉन विषयी माहिती देत ही स्पर्धा आपल्यातील सर्जनशीलता, कल्पकता यासाठी उत्तम व्यासपीठ असल्याचे सांगितले.
ओपन इनोव्हेशन या थीमवर हि स्पर्धा झाली. यामध्ये संघाना प्रोजेक्टसाठी २४ तासांचा वेळ देण्यात आला होता. वर्धमान कॉलेजच्या संघाने फार्मर कनेक्ट या संकल्पनेवर तयार केलेल्या प्रोजेक्टला प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले. मधुकुमारी, श्रीष्मा, साई नित्या प्रिया आणि माकिनेनी उदय किरण यांनी शेतकऱ्यांना सर्व माहिती देणारे, शेतीमाल योग्य दरात पोहोचवणारे आणि रोगांना आळा घालण्यासाठीचे तंत्रज्ञान यात विकसित केले. द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या सिंबायोसिसच्या निशित बोहरा, अवंतिका पाटील आणि ओंकार थोरवे ‘२ डी ब्लू प्रिंट कन्व्हर्टेड तो ३ डी’ हा प्रोजेक्ट सादर केला. तर डी.वाय.पाटील अभियांत्रिकीच्या विराज नवसारे, अक्षता राजिगिरे, श्रावणी जाधव, आदित्य भराडे यांच्या संघाच्या लोखंडावर चढणारा गंज ओळखणारे आणि त्यामुळे होऊ शकणारे अपघात रोखणाऱ्या तंत्रज्ञानाला तृतीय क्रमाकाने सन्मानित करण्यात आले. जेनएआय डेव्हलपर ओंकार माने, हाय अॅटीटयूड कॉफीचे सीईओ सुबोध पाटील, टीडेक्स स्पीकर विश्वजित काशीद, प्राचार्य डॉ. एस. डी. चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे, डीन डॉ. बी. डी. जितकर, विभागप्रमुख डॉ. जी. व्ही. पाटील यांच्या हस्ते अनुक्रमे २५ हजार, १५ हजार व १० हजार रुपये बक्षीस व प्रमाणपत्र देऊन विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेतील यशस्वी तसेच सहभागी संघांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए.के. गुप्ता यांनी अभिनंदन केले. यावेळी विविध विभाग प्रमुख, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, स्पर्धक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संकेत पाटीलच्या ‘विराट’वरील पुस्तकाचे प्रकाशन
डाटा सायन्सचा विद्यार्थी संकेत पाटील याने क्रिकेटपटू विराट कोहलीवर लिहिलेल्या “द वन पर्सन थिअरी बिल्डिंग सक्सेस फ्रॉम बिलीफ” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. दरम्यान संकेतने वर्ल्ड फर्स्ट ए आय ऑटोनॉमस डेटा सायंटिस्ट या ए.आय. टूलची निर्मिती केली आहे. या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूकीसाठी लवकरच तो विराट कोहलीची भेट घेणार आहे.