
no images were found
नवीन सुरुवात साजरी करण्यापासून ते परंपरांचा मान राखण्यापर्यंत: सोनी सबचे कलाकार गुढी पाडव्याच्या आपल्या सुंदर आठवणी शेअर करत आहेत
गुढी पाडवा म्हणजे मराठी लोकांचे नवे वर्ष आणि विविध वैज्ञानिक, धार्मिक आणि शेतकी कारणांमुळे हा दिवस लक्षणीय असतो. या सणाच्या निमित्ताने सोनी सबवरील कलाकार सरिता जोशी, आदित्य रेडिज, सायली साळुंखे, चिन्मयी साळवी आणि जयेश मोरे आपल्या गुढीपाडव्याच्या स्मृतींना उजाळा देत आहेत आणि यंदा ते काय करणार आहेत हे देखील शेअर करत आहेत.
‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेत राधा काकूची भूमिका करत असलेली सरिता जोशी म्हणते, “गुढी पाडव्यापासून आमचे नवे वर्ष सुरू होते. आपल्या कुटुंबंसमवेत नवी सुरुवात आणि सणाचा आनंद घेण्याचा हा सण आहे. दर वर्षी या दिवशी मी पारंपरिक महाराष्ट्रीयन पोशाख करते, पूजा करते आणि सगळ्यांना आवडणारे गोड-धोड पदार्थ करते. घराबाहेर उभारलेली गुढी हे समृद्धी आणि यशाचे प्रतीक आहे. नववर्षाची सुरुवात सकारात्मक मनाने करण्याची याद ही गुढी देते. लहान असताना त्या गुढीवर घातलेल्या गाठीच्या माळेवर माझा डोळा असे. गुढी उतरवल्यानंतर आम्हाला ती मिळत असे. आजही या दिवशी सिद्धिविनायक मंदिरात दर्शन करून आल्यावर मन कृतज्ञता आणि आशेने भरून जाते. सर्वांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा – हे वर्ष सर्वांसाठी सुख, आरोग्य आणि यश घेऊन येवो!”
‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेत दिलीप पटेलची भूमिका करणारा अभिनेता जयेश मोरे म्हणतो, “मी सर्वसाधारणपणे सकाळी लवकर माझ्या कुटुंबीयांसह पूजा करतो आणि मग आम्ही सगळे मिळून न्याहारी करतो. मला हा सण खूप प्रिय आहे कारण मी लहान असताना या दिवशी श्रीखंड पुरीचा बेत असायचा. मला अशा आहे की या गुढी पाडव्याला लोक थोडा श्वास घेऊन सरलेल्या वर्षाबद्दल चिंतन करतील आणि नववर्ष कसे असावे याची कल्पना करतील. सर्वांना गुढी पाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!”
‘वीर हनुमान’ मालिकेत अंजनीची भूमिका करत असलेली सायली साळुंखे म्हणते, “गुढी पाडवा हा माझा आवडता सण आहे. लहानपणी मी बघितले आहे की माझी आई आणि आजी गुढीपाडव्याची जय्यत तयारी करत. या दिवशी आम्ही खरेदी करतो आणि घर सुशोभित करतो. या सणाशी माझ्या सुंदर आठवणी निगडीत आहेत. आईसोबत गुढीसाठी एक छानशी साडी शोधण्याची आठवण त्यातलीच एक आहे. माझ्या कुटुंबाची परंपरा आजही तशीच सुरू आहे. मी देखील दर वर्षी माझ्या कुटुंबासमवेत गुढी उभारते, ती सुशोभित करते. श्रीखंड, पुरी, बटाट्याची भाजी आणि इतर पारंपरिक पदार्थांचा आस्वाद घेतल्याशिवाय या सणाचा आनंद पूर्णच होत नाही. माझ्या सर्व चाहत्यांना मी विनंती करेन की त्यांनी प्रेमाने आणि भक्तीने हा सण साजरा करावा.”
‘वागले की दुनिया’ मालिकेत सखीची भूमिका करणारी चिन्मयी साळवी म्हणते, “गुढी पाडवा म्हणजे आपल्या कुटुंबासोबत आणि मित्रमंडळींसोबत एकत्र मिळून आनंद साजरा करण्याचे पर्व. आम्ही पारंपरिक पद्धतीने घराच्या बाहेर दिसेल अशी उंच गुढी उभारतो. ही गुढी म्हणजे समृद्धी आणि भाग्याचे प्रतीक आहे. मला गुढी सजवायला खूप आवडते. घरीच श्रीखंड बनवून श्रीखंड-पुरीचा बेत करण्याची परंपरा आमच्या घरी आहे. मी माझ्या आईला त्यात मदत करते.”
‘तेनाली रामा’ मालिकेत राजा कृष्णदेवरायाची भूमिका करणारा आदित्य रेडिज म्हणतो, “नवीन सुरुवात, समृद्धी आणि महाराष्ट्राचा वैभवशाली सांस्कृतिक वारशाचे प्रतीक म्हणजे गुढी पाडव्याचा सण. सकारात्मक मनाने नवीन ध्येय ठरवण्याचा आणि आपल्या कुटुंबासोबत आणि प्रियजनांसोबत मजेत वेळ घालवण्याचा हा सण आहे. मी आशा करतो की हा सण सर्वांच्या जीवनात सुख, यश आणि आरोग्य घेऊन येवो! सर्वांना गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा!”