no images were found
महर्षी शिंदे प्राच्यविद्येचे पहिले विवेकी अभ्यासक: हेमंत राजोपाध्ये
कोल्हापूर (प्रतिनिधी): महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे प्राच्यविद्येचे पहिले भारतीय विवेकी अभ्यासक होते, असे प्रतिपादन हेमंत राजोपाध्ये यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासनाच्या वतीने महर्षी शिंदे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित ‘प्राच्यविद्या आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे’ या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते.
हेमंत राजोपाध्ये म्हणाले की, महर्षी शिंदे यांनी प्राच्यविद्येच्या अंगाने भारतीय समाजाचे विश्लेषण केले. तसेच भारतीय ज्ञानपरंपरा आणि प्राच्यविद्या यांची फेरमांडणी केली. त्यातील प्रामाण्य खोडून काढण्याचे काम केले. महाराष़्ट्रात आरंभकाळात प्राच्यविद्येचा अभ्यास करणारे ते पहिले भारतीय संशोधक होते. भारतीय परंपरा व संस्कृतीचे त्यांना डोळस भान होते. त्यांच्या या अभ्यासात इतिहास, तौलनिक धर्मदृष्टी, समाजशास्त्र व भाषाभ्यासाची दृष्टी होती.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के यांनी, महर्षी शिंदे यांचे न वाचले गेलेले पैलू विद्यार्थ्यांनी वाचायला हवेत, ज्यामुळे महर्षींची नव्याने ओळख होईल, असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यासनाचे समन्वयक डॉ. रणधीर शिंदे यांनी केले. मराठी अधिविभाग प्रमुख डॉ.नंदकुमार मोरे यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. सुस्मिता खुटाळे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास डॉ. अशोक चौसाळकर, डॉ. राजन गवस, डॉ. प्रकाश पवार, डॉ. भारती पाटील, डॉ. अवनीश पाटील, डॉ. प्रभंजन माने, डॉ. अक्षय सरवदे, डॉ. अरूण शिंदे यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.