
no images were found
एनआयटीच्या विद्यार्थ्यांचे तंत्रशिक्षण मंडळाच्या प्रोजेक्ट स्पर्धेत यश
कोल्हापूर (प्रतिनिधी):-श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगांव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीमधील तृतीय वर्ष एआयएमएल विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ आयोजित राज्यस्तरीय प्रोजेक्ट स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. विवान कानिटकर, हर्ष सुतार, पार्थ सुर्यवंशी, पारस कवितकर व पार्थ मिरजकर यांच्या ‘हेड कंट्रोल्ड माऊस कर्सर विथ व्हाईस कमान्ड्स फाॅर हॅन्डीकॅप्ड पर्सन’ या प्रोजेक्टने तब्बल ८१ प्रोजेक्ट्समधून हे यश संपादन केले. डोक्याच्या हालचालींवरून संगणकीय यंत्रणेला सुचना देता येत असल्याने हा प्रोजेक्ट दिव्यांग व्यक्तींना वरदान ठरेल असे प्रोजेक्टचे मार्गदर्शक प्रा. अश्विनकुमार व्हरांबळे यांनी सांगितले. गरजू समाज घटक, शेती, उर्जा, वाहन व निर्मिती उद्योग अशा विविध क्षेत्रातील समस्यांवर एआय तंत्रज्ञानातून उपाय शोधण्यासाठी एनआयटीमध्ये नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट्सना देत असलेल्या प्रोत्साहनाचे हे फलित असून यातून लवकरच स्टार्टअप सुरू होतील असे प्रतिपादन संचालक डाॅ. संजय दाभोळे यांनी यावेळी केले. सदर विद्यार्थ्यांना ट्राॅफी, प्रमाणपत्र व पन्नास हजार रूपयांचे पारितोषिक मिळाल्याची माहिती एआयएमएल विभागप्रमुख प्रा. विक्रम गवळी यांनी दिली. ‘प्रिन्स शिवाजी’ संस्थेचे चेअरमन डाॅ. के. जी. पाटील व व्हाईस चेअरमन डी. जी. किल्लेदार यांनी विजेते विद्यार्थी व मार्गदर्शक यांचे अभिनंदन केले.