
no images were found
‘अर्थ अवर’च्या माध्यमातून शहरात एक तास वीज बचत
डी. वाय. पाटील अभियांत्रिकीतर्फे शाहू समाधी स्थळ येथे उपक्रम
कोल्हापूर, (प्रतिनिधी):-विजेच्या बचतीचे महत्त्व नागरिकांना समजावे, कार्बनच्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या उत्सर्जनास प्रतिबंध व्हावा, याकरिता आज अर्थ अवर उपक्रमांतर्गत शहरातील ३० हजार पथदिवे बंद करून एक तास विजेची बचत करण्यात आली. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, महापालिका, महावितरण यांच्यावतीने उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी शाहू समाधी स्थळ येथे २ हजार पणत्या प्रज्वलित केल्या.
साडेसात ते साठेआठ वेळेत महापालिकेच्या विद्युत विभागाने ३० हजार पथदिवे बंद केल्याने एका तासात १८५० किलो कार्बन तयार होण्यास प्रतिबंध झाला. जगभरात २००७ पासून हा उपक्रम सुरू झाला. १९० देशांत हा उपक्रम राबविला जातो. हा उपक्रम राबविणारे कोल्हापूर हे देशातील एकमेव शहर ठरले आहे. डी. वाय. इंजिनिअरिंगतर्फे २०१० पासून ‘अर्थ अवर’चे आयोजन केले जाते. २ हजार पणत्या प्रज्वलित केल्यामुळे शाहू समाधी स्थळ येथील परिसर उजळून निघाला. नागरिकांना अर्थ अवरचे महत्त्व विद्यार्थ्यांनी सांगितले.
डी वाय पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे , रजिस्टर डॉ. लितेश मालदे अधिष्ठाता डॉ. राहुल पाटील , एनएसएस समन्वयक प्रा. योगेश चौगुले, प्रा. इंद्रजीत जाधव, प्रा. नीलिमा वटकर, प्रा. मंजीत जाधव, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी विद्यार्थिनी आदींनी सहभाग घेतला. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील यांचे या उपक्रमाला मार्गदर्शन व मोलाचे सहकार्य लाभले.