
no images were found
“पर्यावरणाची काळजी घेत असतानाही प्रत्येक घटकातून हनुमानाचे पावित्र्य प्रतिबिंबित होईल याची खातरजमा आम्ही केली : ओमंग कुमार
‘वीर हनुमान’ या भव्य आणि धार्मिक मालिकेद्वारे प्रेक्षकांचे मन वेधून घेण्यासाठी सोनी सब सज्ज आहे. या मालिकेत आन तिवारी (बाल हनुमान), आरव चौधरी (केसरी), सायली साळुंखे (अंजनी) आणि माहिर पांधी (वाली आणि सुग्रीव) हे कलाकार भूमिका करत आहेत.11 मार्चपासून सुरू होत असलेल्या या मालिकेत बाल मारुतीचे महाबली हनुमनात रूपांतर होण्याची कथा विशद करण्यात येणार आहे.
या भव्य मालिकेसाठी एक साजेसा आणि नितांत सुंदर सेट तयार केला आहे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि प्रॉडक्शन डिझाईनर ओमंग कुमारने. हा सेट म्हणजे कलात्मक नैपुण्य आणि पर्यावरण-दक्ष सर्जनशीलतेचे प्रतीक आहे. हनुमानाचे जन्म स्थान- किष्किंधा राज्य दर्शविणारा सेट बनवण्यासाठी सुमारे तीन महीने लागले होते. यामधील प्रत्येक तपशीलात त्या काळाच्या खुणा दिसतात तसेच पर्यावरण अनुकूलता देखील दिसून येते.
या सेटमध्ये क्ले-मोल्डिंगसाठी तसेच बारीक आणि वास्तव दिसणारी टेक्श्चर तयार करण्यासाठी क्ले पावडरचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे. दिव्य सौंदर्य वाढवण्यासाठी कागदी फुला-पानांचा योग्य वापर करण्यात आला आहे. गुहेच्या भिंतींवर वाळलेल्या मुळांसारखे नैसर्गिक घटक वापरुन वास्तव आणि कला यांची सांगड घातली आहे. धबधब्याच्या भिंतीसाठी सिमेंटचे कास्टिंग करून बनवलेले खडक वापरुन पवित्र गुहा आणि नद्यांचा प्रदेश जिवंत केला आहे, तर सिमेंट कास्टचे ब्लॉक नदीचा प्रवाह दाखवण्यासाठी कौशल्याने वापरले आहेत.
आपले विचार मांडताना ओमंग कुमार म्हणाला, “वीर हनुमान मालिकेसाठी सेट उभारणे हा सार्थकता देणारा अनुभव होता. आम्हाला ही खातरजमा करायची होती की, प्रत्येक घटकातून हनुमानाच्या जीवनातील पावित्र्य झळकेल. मात्र त्याच वेळी पर्यावरणाबाबतही आम्ही जबाबदार दृष्टिकोन ठेवला. आम्हाला खात्री वाटते की, हे आकर्षक विश्व प्रेक्षकांना हनुमनाच्या दिव्य जगात घेऊन जाईल.”