
no images were found
‘शिवाजी विद्यापीठा’च्या नामविस्तारासाठी 17 मार्चचा होणारा मोर्चा सर्व शक्तीनिशी यशस्वी करण्याचा निर्धार !
कोल्हापूर(प्रतिनिधी ):– कोल्हापूर येथील ‘शिवाजी विद्यापीठ’ या नावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपूर्ण उल्लेख असल्याने विद्यापीठाचे नाव अधिक सन्माननीय आणि पूर्ण स्वरूपात ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’, असे करण्यात यावे, या मागणीसाठी सोमवार, 17 मार्चला कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी 3 वाजता भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. नामविस्ताराचा हा मोर्चा पूर्णशक्तीनिशी यशस्वी करण्याचा निर्धार कावळा नाका येथील ‘गीता मंदिर’ येथे मोर्चाच्या नियोजनासाठी 1 मार्च या दिवशी आयोजित बैठकीत करण्यात आला. हिंदु राष्ट्र समन्ववय समिती आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित या बैठकीसाठी विविध संप्रदाय, गडप्रेमी संघटना, वारकरी संप्रदाय, आध्यात्मिक संघटना, तरुण मंडळे, हिंदुत्वनिष्ठ संघटना, पक्ष यांचे 200 हून अधिक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रारंभी मोर्चाच्या तयारीविषयी माहिती देतांना हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट म्हणाले, ‘‘या निमित्ताने आम्ही विविध लोकप्रतिनिधींच्या भेटी घेतल्यावर सर्वांनी या मोर्चाला पाठिंबा दिला आहे. अनेकांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात ‘लक्षवेधी’ लावू, ‘औचित्याचा मुद्दा’ उपस्थित करू, असे सांगितले. राजकीय पक्षाच्या लोकप्रनिधींना ‘एक हिंदू’ म्हणून सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. काही लोक बुद्धीभेद करून छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ झाल्यास त्याचे ‘लघुरूप’ होईल असा खोटा ‘नॅरेटिव्ह’ पसरवत आहेत. या मोर्चासाठी पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांचे आशीर्वाद असून त्यांचे धारकरी यात सहभागी होणार आहेत.’’
मान्यवरांचे मनोगत
श्री’ संप्रदायाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री. कृष्णाजी माळी म्हणाले, ‘‘या मोर्चासाठी जगद्गुरु रामानंदाचार्य प.पू. नरेंद्रचार्यजी महाराज यांचा आशीर्वाद असून सांगली, कोल्हापूर, बेळगाव या जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भक्तगण सहभागी होणार आहेत.’’ ‘छत्रपती ग्रुप’चे संस्थापक श्री. प्रमोददादा पाटील म्हणाले, ‘‘आपण जरी वेगवेगळ्या संघटनांमध्ये जरी काम करत असलो, तरी हिंदुत्वाच्या कार्यासाठी आपण संघटित झाले पाहिजे. अनेक मंडळांपर्यंत आपण हा विषय पोचवला पाहिजे. आपण धर्मासाठी एकत्र आले पाहिजे.’’
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कोल्हापूर जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव म्हणाले ‘‘ श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’च्या प्रमुखांना घेऊन बैठकीचे आयोजन करू आणि सहस्रोंच्या संख्येने धारकरी येण्यासाठी प्रयत्न करू.’’ वीर शिवा काशीद यांचे वंशज श्री. शिवा काशीद म्हणाले, ‘‘मर्दानी खेळ, शिवकालीन युद्धकला सादर करणारी पथके , तालीम यांनाही संपर्क केला असून या सर्वांनी मोर्चासाठी येणार असल्याचे सांगितले.’’
वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. अनिल यादव महाराज म्हणाले, ‘‘वारकरी संप्रदायाचे भाविक मोठ्या संख्येने यात सहभागी होतील यांसाठी प्रयत्न करू.’’ हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. आनंदराव पवळ म्हणाले, ‘‘कोल्हापूरातील प्रत्येक मंडळापर्यंत आम्ही पोचणार असून मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित रहाणार आहे. आम्ही ज्या ज्या लोकप्रतिनिधींना भेटलो त्या सर्वांनी पाठिंबा देऊन मोर्चाचा प्रचार करणार असल्याचे सांगितले. कागल येथील ‘श्री छत्रपती फोर्स’चे श्री. अजितसिंह कदम म्हणाले, ‘‘गेल्या 7 वर्षांपासून यासाठी आम्ही प्रयत्न करतच आहोत. या मागणीसाठी आम्ही सहस्रो राष्ट्रप्रेमींच्या स्वाक्षरी घेतल्या आहेत.’’ महाराष्ट्र मंदिर महासंघाचे कोल्हापूर सहजिल्हासंयोजक श्री. अभिजित पाटील म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील प्रत्येक मंदिरांपर्यंत हा विषय पोचवून प्रत्येक मंदिराच्या बाहेर फलक लागण्यासाठी प्रयत्न करू.’’
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवासेनेचे जिल्हाध्यक्ष श्री. अभिषेक राऊत म्हणाले, ‘‘या मोर्चासाठी विविध विद्यार्थी संघटनांपर्यंत पोचून मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित रहाण्यासाठी प्रयत्न करू.’’ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. भगवंतराव जांभळे म्हणाले ‘‘आपण अनेक मंदिरे, अनेक सेवा सोसायटी, ‘रोटरी’सारख्या सामाजिक संस्थांचे ठरावही आपल्याला मिळतील.’’ शिवसेनेचे सांगली जिल्हाप्रमुख श्री. महेंद्र चंडाळे म्हणाले, ‘‘सांगली जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शिवसैनिकांसह आम्ही या मोर्चात सहभागी होऊ.’’
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. शरद माळी, हिंदू एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष श्री. गजानत तोडकर यांसह विविध संघटनांच्या प्रमुखांनी प्रचाराच्या विविध संकल्पना मांडून त्या कृतीत आणू अशी ग्वाही दिली. या बैठकीसाठी ‘मराठा तितुका मेळावावा’चे श्री. योगेश केरकर, शिवसेनेचे माजी पंचायत समिती सदस्य श्री. कृष्णात पाटील, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, हिंदु महासेभेचे जिल्हाध्यक्ष श्री. राजू तोरस्कर, सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे, जयसिंगपूर भाजपचे शहर चिटणीस श्री. सुनील ताडे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी यांच्यासह अधिवक्ता, डॉक्टर, उद्योजकही उपस्थित होते.