Home राजकीय ८ मार्चला शक्तीपीठ महामार्ग समर्थनार्थ भव्य मेळावा

८ मार्चला शक्तीपीठ महामार्ग समर्थनार्थ भव्य मेळावा

20 second read
0
0
34

no images were found

८ मार्चला शक्तीपीठ महामार्ग समर्थनार्थ भव्य मेळावा

 

कोल्हापूर (प्रतिनिधी):- जे शेतकरी बाधित होत नाहीत अशा लोकांना सोबत घेवून जिल्हावासीयांची दिशाभूल करणाऱ्या आमदार सतेज पाटील यांनी विकासाला विरोध करण्यापेक्षा पालकमंत्री, मंत्री, आमदार म्हणून जिल्ह्याच्या विकासासाठी काय केले? याचे आत्मपरीक्षण करावे. थेट पाईपलाईनमधून अभ्यंगस्नान करण्यासाठी कोल्हापूर शहरवासीयांच्या किती दिवाळी खर्ची घातल्या. त्यानंतर स्वत: आंघोळ करून गळकी थेट पाईपलाईन योजना शहरवासीयांच्या माथी मारली, याकडे लक्ष द्यावे, असा उपहासात्मक टोला राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे लगावला.

ते पुढे म्हणाले कि, विरोधाला विरोध करण्याचे काम होत असल्याने जिल्ह्याचा विकास खुंटला आहे. अशा प्रकारचे प्रकल्प जिल्ह्याच्या विकासाला गती देणारे असताना यासही राजकीय स्वार्थापोटी विरोध केला जात आहे. सद्या माजी पालकमंत्री यांच्याकडे महायुतीला विरोध करण्याशिवाय दुसरे कोणतेही काम शिल्लक नाही. छत्रपती शाहू महाराजांचा विजय हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विजय आहे. पण, त्याचे श्रेय मिळत नाही म्हणून शक्तीपीठ महामार्गाला याचे कारण बनविले जात आहे. शक्तीपीठ महामार्ग हा निवडणुकीचा मुद्दा नसून विकासाचा मुद्दा आहे. हा राजकीय विषय असता तर महायुतीचे दहा पैकी दहा उमेदवार निवडणून आले असते काय? महायुतीचा विजय हा जनतेचा विजय आहे. त्याला शक्तीपीठ महामार्गाचे वळण लावून शेतकरी बांधवांची आणि संपूर्ण जिल्हावासीयांची दिशाभूल करण्याचे काम विरोधकांकडून होत आहे. शक्तीपीठ महामार्ग हा महायुती शासनाचा ड्रीम प्रोजेक्ट असून जिल्ह्याच्या विकासात मोलाचे योगदान देणारा ठरणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प होणारच यावर मी आजही ठाम आहे.

आमदार सतेज पाटील यांच्याकडे मंत्री पद, पालकमंत्री पद होते. महापालिकेत त्यांची सत्ता होती पण त्यांनी शहरासाठी काय केले याचे आत्मपरीक्षण करावे. ते सद्या विधानपरिषद सदस्य असून त्यांना महापालिकेत बैठक घेण्याचा अधिकार आहे त्यांनी बैठक घेवून त्यांनी केलेल्या कामाची आणि राज्य नियोजन मंडळाचा कार्यकारी अध्यक्ष म्हणून मी गेल्या अडीच वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा तपासावा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मी कन्व्हेन्शन सेंटर, रंकाळा तलाव, गांधी मैदान, रस्त्यांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आणला आहे. कोल्हापूर सांगली पूरस्थिती नियंत्रणासाठी ३२०० कोटींचा प्रकल्प आणला आहे. आगामी काळात कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणखी कोट्यावधी रुपयांचा निधी आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. याउलट त्यांनी विकासाचे काय काम केले जाहीर करावे. सद्या लोकांना विकास हवा असून, त्यांची दिशाभूल करण्याचे करू नये. जे विरोधकांच्या व्यासपीठावर आहेत ते बाधित नाहीतच पण जे आमच्या बाजूने आहेत ते खरे बाधित शेतकरी आहेत ते शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ आहेत. येत्या काळात शक्तीपीठ महामार्ग समर्थकांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येईल, असेही त्यांनी याद्वारे सांगितले आहे.

यात पुढे म्हंटले आहे कि, शक्तीपीठ महामार्ग समर्थक शेतकरी बांधवांची एकजूट होत असून, विरोधकांकडून होणारी दिशाभूल प्रकल्प बाधित शेतकरी बांधवांच्या लक्षात येत असल्याने शेतकरी बांधव मोठ्या संख्येने या महामार्गास समर्थक करण्यास पुढे येत आहेत. येत्या दि.०८ मार्च २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता “ए.एस. मुस्कान लॉन, मार्केट यार्ड जवळ, कोल्हापूर” येथे शक्तीपीठ महामार्ग समर्थनार्थ भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेलाव्यास खासदार धनंजय महाडिक यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व हजारो प्रकल्प बाधित शेतकरी बांधव उपस्थित राहणार असल्याचीही माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

 

शक्तीपीठ महामार्ग समर्थनासाठी शेतकरी बांधवांचे प्रबोधन करणार : श्री.दौलतराव जाधव, माजी संचालक गोकुळ दुध संघ

       शक्तीपीठ महामार्गामुळे चांगल्या दळणवळण सुविधा निर्माण झाल्यास औद्योगिक, आय.टी. क्षेत्रासह पर्यटन विकासालाही चालना मिळणार आहे. यातून स्थानिकांना रोजगार निर्मितीस चालना मिळणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याची इतर जिल्ह्यांशी कनेक्टीव्हिटी वाढणार आहेच पण कोल्हापूर जिल्ह्याच्या टोकाशी असलेला भुदरगड सारखा ग्रामीण भाग विकासाच्या मुख्य प्रवाहात येणार आहे. त्यामुळे हा महामार्ग व्हावा, अशी आम्हा प्रकल्पात बाधित होणाऱ्या शेतकरी बांधवांची भूमिका आहे. शक्तीपीठ महामार्ग विरोधापेक्षा त्यापासून होणाऱ्या फायद्यांचे पारडे अधिक जड आहे. त्यामुळे समर्थनासाठी शेतकरी बांधवांचे प्रबोधन करण्याची मोहीम हाती घेतली असून शक्तीपीठ महामार्ग समर्थन मेळाव्यास शेतकरी बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन गोकुळचे माजी संचालक दौलतराव जाधव यांनी केले. यासह समर्थक शेतकरी बांधवांचे शिष्ठमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती दिली. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने शिवालय शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे शक्तीपीठ महामार्ग समर्थकांची समन्वय बैठक पार पडली. 

       यावेळी बोलताना महिला प्रतिनिधी रुचीला बाणदार यांनी, शक्तीपीठ महामार्ग समर्थनात लोकप्रतिनिधींची पाठींबा पत्रे घेतली जात असल्याचे सांगत महामार्गाच्या समर्थनार्थ जिल्ह्यासह राज्यातील अनेक लोकप्रतिनिधी सकारात्मक असून यात पुढाकार घेत असल्याचे सांगितले.

        या बैठकीस शिवसेनेचे कमलाकर जगदाळे, शेळोलीचे सरपंच प्रशांत देसाई, देवर्डेचे विजय हवालदार, सांगवडेवाडीचे राजेश जठार, नेर्ली – विकासवाडीचे अमोल मगदूम, नवनाथ पाटील, आनंदा धनगर, मकरंद चौगले, सांगवडेवाडीचे दत्ता रावळ, पट्टणकोडोलीचे रोहित बाणदार, आनंदा बाणदार, व्हन्नूरचे रघुनाथ पाटील, कागलचे संदीप मालवेकर, गणेश मालवेकर, अविनाश पाटील आदी उपस्थित होते.    

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मुख्य इमारतीमधील नागरी सुविधा केंद्र देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे पाच दिवस बंद छत्रपती शिव…