
no images were found
शिवाजी विद्यापीठात मराठी भाषा गौरव दिनाचा उत्साह
कोल्हापूर,(प्रतिनिधी): – कुसुमाग्रजांची कविता शाश्वत सत्य मांडणारी आहे, असे प्रतिपादन प्रा. राजेंद्र दास यांनी आज केले. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठातील मराठी अधिविभागात आयोजित कवी कुसुमाग्रज व्याख्यानमालेत ‘कवी कुसुमाग्रज यांची कविता’ या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के अध्यक्षस्थानी होते.
प्रा. दास म्हणाले की, कुसुमाग्रज यांच्या कवितेने मराठी कवितेत एका युगाची निर्मिती केली. त्यांची कविता वर्धिष्णु स्वरूपाची आहे. भव्य, दिव्य आणि मंगलतेची पूजा करणारा कवी म्हणून कुसुमाग्रज मराठी काव्यविश्वाला परिचित आहेत. कुसुमाग्रजांनी मराठी कवितेला मोलाचे योगदान दिले आहे. मराठी मनाची स्पंदने त्यांनी आपल्या कवितेतून मांडली.
मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे यांनी प्रास्ताविक केले. अमोल देशमुख यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सुखदेव एकल यांनी आभार मानले. कार्यक्रमाला इंग्रजी अधिविभाग प्रमुख डॉ. प्रभंजन माने, डॉ. अक्षय सरवदे, डॉ. दीपक भादले तसेच संत बाळूमामा भजन मंडळाचे (हुपरी) वारकरी, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रंथदिंडीचा उत्साह
मराठी भाषा गौरव दिनाचा उत्साह शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांमध्ये सकाळपासूनच ओसंडून वाहात होता. मराठी अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी मुख्य प्रशासकीय इमारतीपासून वि.स. खांडेकर भाषा भवनापर्यंत ग्रंथदिंडीचे आयोजन केले. मुख्य इमारतीसमोर कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. पालखीमध्ये भारतीय संविधान, श्री ज्ञानेश्वरी, श्री नामदेव गाथा, तुकारामबोवांच्या गाथेचे निरुपण हे ग्रंथ ठेवण्यात आले होते. पालखीपूजनानंतर विद्यापीठ प्रांगणातून ‘ज्ञानबा-तुकाराम’च्या गजरात दिंडी काढण्यात आली. हुपरीच्या संत बाळूमामा भजनी मंडळाचे लिंगाप्पा मुधाळे, चंद्रकांत ऐनापुरे, भीमराव जाधव, काकासो हांडे, धोंडीराम मुधाळे, दिग्विजय खोत, संजय लवटे, दीपक मर्दाने, विजय गोरे, जयसिंग घोरपडे, विनायक मानकापूर, सौरभ मधाळे, विजय लोकरे आदींनी दिंडीमध्ये मोठी रंगत आणली.