no images were found
कोल्हापूरच्या अर्थिक प्रगतीत औद्योगिक क्षेत्राचे योगदान महत्त्वाचे – अमोल येडगे
कोल्हापूर : जिल्हयातून जीडीपीतील वार्षिक वाढ 18 टक्के होणे अपेक्षित असून यासाठी औद्योगिक क्षेत्रातून मोठी वाढ अपेक्षित आहे. औद्योगिक क्षेत्राचा समावेश विकासासाठी मैलाचा दगड असून कोल्हापूरच्या अर्थिक प्रगतीत औद्योगिक क्षेत्राचे योगदान महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. त्यांच्याहस्ते हॉटेल पॅव्हिलीयन येथे उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी, गुंतवणूकदार व व्यवसायांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याकरीता उद्योग विभागामार्फत जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषेदचे आयोजन करण्यात आले होते त्याचे उद्घाटन झाले. यावेळी ते म्हणाले, अर्थिक गुंतवणूकीबरोबरच जिल्हयात या
क्षेत्राने रोजगारही दिला आहे. प्रगतीसाठी व रोजगार निर्मितीसाठी जिल्हयात नवीन उद्योग उभारणीसाठी उद्योजकांबरोबर सकारात्मक निर्णय घेवून त्यांच्या पाठीशी उभे राहू. सर्वच क्षेत्राबरोबर आता पर्यटन क्षेत्रातही मोठी गुंतवणूक करण्याचे त्यांनी आपल्या मनोगतामधे उपस्थितांना आवाहन केले. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजय पाटील, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक गणेश गोडसे, विजय शिंदे, प्रशांत मासाळ व मोठ्या संख्येने कोल्हापूर मधील उद्योजक उपस्थित होते.
या परिषदेत जिल्हयातील 1100 कोटी रूपयांचे विविध सामंजस्य करार करण्याचे उद्दीष्ट ठरविण्यात आले होते. यापुढे जात एकुण 1480 कोटी रूपयांचे वेगवेगळ्या उद्योजकांनी उद्योग विभागाबरोबर सामंजस्य करार केले. यात प्रामुख्याने लक्ष्मी पंपस् 30 कोटी, घोडावत गृप 54 कोटी, जे के प्रिंट 20 कोटी, आदित्य मेटालीक 30 कोटी, डेल्टा इरीगेशन 74 कोटी यांचा समावेश आहे. यावेळी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याहस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. जिल्ह्यांना विकासाचा केंद्र बिंदू मानून जिल्ह्याच्या व राज्याच्या विकासाला चालना देणे हा या जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचा उद्देश होता. या परिषदेत जिल्ह्यातील प्रमुख उद्योग क्षेत्राबाबत चर्चासत्र, गुंतवणुकीच्या संधी, इतर क्षमता असलेल्या क्षेत्रांमधील गुंतवणूक व व्यवसाय संधीबाबत चर्चा, सामंजस्य करारस्वाक्षरीबाबत कार्यक्रम संपन्न झाले. जिल्ह्याच्या निर्यातक्षम उत्पादनांचे प्रदर्शन, भौगोलिक मानांकने असलेली उत्पादने, एक जिल्हा एक उत्पादन, जिल्ह्यातील स्थापित औद्योगिक समूह, विविध योजनांचे लाभार्थी यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रास्ताविक जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजय पाटील यांनी केले. तर बँक कर्ज व अनुषंगिक माहिती गणेश गोडसे यांनी दिली. दिवसभरात उपस्थित उद्योजकांनी आपली मनोगत व्यक्त करून व्यवसायातील बारकावे सांगितले.