no images were found
‘एमएसएमई’कडून शिवाजी विद्यापीठाला यजमान संस्था म्हणून मान्यता
कोल्हापूर (प्रतिनिधी) : केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकता मंत्रालयाकडून शिवाजी विद्यापीठास बिझनेस इनक्युबेटर म्हणून कार्य करण्यासाठी यजमान संस्थेचा दर्जा प्रदान केला आहे. ही माहिती कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. कुलगुरू डॉ. शिर्के यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय एमएसएमई मंत्रालयाकडून मिळालेल्या या दर्जामुळे स्थानिक नवसंकल्पक, संशोधकांच्या कल्पना या यजमान संस्थेच्या अर्थात शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून थेट मंत्रालयाकडे सादर करण्यात येऊ शकणार आहेत. त्याचप्रमाणे प्रकल्प भारणी, यंत्रसामग्री विकसन आदींसाठी भरीव अर्थसाह्यही होऊ शकणार आहे. नवसंकल्पनांचे विकसन आणि संवर्धन यासाठी दर संकल्पनेमागे १५ लाख रुपयांपर्यंतचा निधी मंत्रालयाकडून मिळू शकतो. त्याचप्रमाणे यंत्रसामग्री, प्रकल्प उभारणी, हार्डवेअर, सॉफ्टवेअर आदी बाबींसाठीही एक कोटी रुपयांपर्यंतचे अर्थसाह्य मिळू शकते. ही सुविधा स्थानिकांना आता शिवाजी विद्यापीठातच उपलब्ध करण्यात येणार असून त्यामुळे नवोन्मेषी संकल्पनांना मोठे पाठबळ लाभले आहे.
यावेळी विद्यापीठाच्या इनोव्हेशन, इनक्युबेशन व लिंकेजेसचे संचालक डॉ. सागर डेळेकर आणि एसयूके-आरडीएफ चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रकाश राऊत यांनी, स्थानिक नवोन्मेषी नागरिक, विद्यार्थी, संशोधक यांच्यासाठी ही एक महत्त्वाची संधी असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.