Home Uncategorized विद्यापीठात सर्वांगीण विद्यार्थी विकास इमारतीचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते भूमीपूजन

विद्यापीठात सर्वांगीण विद्यार्थी विकास इमारतीचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते भूमीपूजन

2 second read
0
0
26

no images were found

विद्यापीठात सर्वांगीण विद्यार्थी विकास इमारतीचे

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते भूमीपूजन

 

 

कोल्हापूर,(प्रतिनिधी): – शिवाजी विद्यापीठात आज राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते सर्वांगीण विद्यार्थी विकास आणि संगणक सुविधा केंद्राच्या इमारतीचे भूमीपूजन करण्यात आले.

शिवाजी विद्यापीठ मुद्रणालय व सबस्टेशन क्र. १ जवळील परिसरात शिवाजी विद्यापीठाने सर्वांगीण विद्यार्थी विकास आणि संगणक सुविधा केंद्र उभारण्याचे ठरविले आहे. प्रस्तावित इमारतीमध्ये केंद्रीय रोजगार कक्ष, कौशल्य विकास कक्ष, संशोधन व विकास कक्ष, संस्थात्मक नवोन्मेष मंडळ, सेमिनार कक्ष, परिषद सभागृह, एसयूके संशोधन व विकास फौंडेशन, आंतरराष्ट्रीय व्यवहार कक्ष, नवोन्मेष क्लिनिक, प्रयोगशाळा प्रशासक इत्यादी कक्षांचा समावेश असणार आहे.

या इमारतीचे आज दुपारी मंत्री श्री. आबिटकर यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले. त्याचप्रमाणे इमारतीच्या कोनशिलेचे अनावरणही त्यांच्या हस्ते करण्यात आले. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी मंत्री महोदयांना प्रकल्पाच्या आराखड्याविषयी माहिती दिली. त्याचप्रमाणे प्र-कलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कलसचिव डॉ. विलास शिंदे आणि इनोव्हेशन, इनक्युबेशन व लिंकेजेस केंद्राचे संचालक डॉ. सागर डेळेकर यांनी या इमारतीमधील विविध कक्षांची वैशिष्ट्ये आणि महत्त्व याविषयी माहिती दिली.

यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. धनंजय सुतार, आजीवन अध्ययन केंद्र संचालक डॉ. रामचंद्र पवार, उपकुलसचिव रणजीत यादव, अमित कांबळे, विजय पोवार, वैभव आरडेकर यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी, विविध अधिकार मंडळांचे सदस्य, बांधकाम समिती सदस्य, अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रस्तावित इमारतीबाबत थोडक्यात…

सर्वांगीण विद्यार्थी विकास आणि संगणक सुविधा केंद्र इमारतीच्या कामासाठी केंद्र सरकारच्या पीएम-उषा या योजनेअंतर्गत निधी मंजूर झाला असून या इमारतीचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ठेव अंशदान योजनेअंतर्गत करण्यात येणार आहे. इमारतीसाठी सुमारे साडेपाच कोटी रुपये इतका खर्च प्रस्तावित आहे. सध्या तळमजला अधिक पहिला मजला असे बांधकाम प्रस्तावित असून त्यांचे क्षेत्रफळ अनुक्रमे ९४९.४९ चौरस मीटर आणि ९१०.६१ चौरस मीटर असे एकूण १८६०.१० चौरस मीटर इतके असेल.

विद्यापीठात सृजनात्मक, नवोन्मेषी कार्य व्हावे: मंत्री प्रकाश आबिटकर

भूमीपूजन समारंभानंतर व्यवस्थापन परिषद सभागृहात कुलगुरू डॉ. शिर्के यांनी मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासमोर विद्यापीठाच्या वाटचालीविषयी सादरीकरण केले. यामुळे श्री. आबिटकर प्रभावित झाले. ते म्हणाले, मी स्वतः शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थी असल्यामुळे विद्यापीठाने केलेल्या वाटचालीचा मला अभिमान आहे. आपण सर्वांनी मिळून या विद्यापीठाचे भवितव्य अधिक उज्ज्वल होण्यासाठी प्रयत्न करू या. त्यासाठी शासन स्तरावरही सर्वोतोपरी सहकार्य करण्याची भूमिका राहील. विद्यापीठाने सृजनात्मक आणि नवोन्मेषी स्वरुपाचे काम येथून पुढील काळात अधिक गतीने करावे, अशी अपेक्षा श्री. आबिटकर यांनी व्यक्त केली. यावेळी विद्यापीठाचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मुख्य इमारतीमधील नागरी सुविधा केंद्र देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे पाच दिवस बंद छत्रपती शिव…