
no images were found
तेनाली रामा’मध्ये तेनाली अखेर कृष्णदेवराय राजासमोर आला; राजा त्याला पुन्हा दरबारात त्याचे स्थान बहाल करणार का?
सोनी सबवरील ‘तेनाली रामा’ मालिकेत महान दरबारी कवी आणि चतुर, बुद्धिमान तेनाली रामा (कृष्ण भारद्वाज)च्या कथा सादर करण्यात येत आहेत. सध्या सुरू असलेल्या कथानकात तेनाली लपतछपत विजयनगरात परतला आहे. आपल्या राज्याला शत्रूपासून मोठा धोका असल्याची कुणकुण त्याला लागली आहे. या साम्राज्याचे रक्षण करण्यासाठी त्याचे बुद्धीचातुर्य पणाला लागणार आहे.
आगामी भागांमध्ये, तेनाली हुबेहूब तथाचार्यांसारख्या दिसणाऱ्या वेंकण्णा (पंकज बेरी)ला अक्कल-हुशारीने हाताशी धरतो आणि त्याच्या योजनेनुसार वेकण्णा त्याला आपल्या पाठीवर घेऊन निघतो. हे आगळेवेगळे दृश्य राजा कृष्णदेवरायाचे (आदित्य रेडिज) लक्ष वेधून घेते. परिस्थितीचा चुकीचा अर्थ काढत तो आपल्या सैनिकांना तथाचार्यांच्या खांद्यावर बसलेल्या इसमाला पकडून आणायला सांगतो. शिक्षेच्या भीतीने बावचळून वेंकण्णा तेनालीने दिलेली चिठ्ठी राजाला देतो. ती चिठ्ठी वाचल्यानंतर, राजा कृष्णदेवरायाला तेनालीने केलेली युक्ती समजते. ज्यावेळी तेनाली राजाला शरण येतो, त्यावेळी एका भोपळ्याने आपला चेहरा राजापासून लपवतो कारण यापुढे आपण राजाला तोंड दाखवणार नाही, असे वचन त्याने राजाला दिलेले असते. यानंतर, तब्बल दोन वर्षांनंतर राजा आणि तेनाली रामा यांची आमनेसामने भेट होते.
राजा कृष्णदेवराय तेनाली रामाला आपल्या दरबारातील त्याचे स्थान परत देईल का?
‘तेनाली रामा’ मालिकेत तेनालीची मध्यवर्ती भूमिका करणारा अभिनेता कृष्ण भारद्वाज म्हणतो, “तेनाली रामाचे चातुर्य हीच त्याची ताकद आहे, पण यावेळी, तेनालीलाफक्त आपल्या शत्रूवर कुरघोडी करायची नाही आहे, तर राजासमोर आपली इमानदारी आणि सचोटी देखील सिद्ध करायची आहे. या महत्त्वाच्या प्रसंगात तेनालीची व्यक्तिरेखा साकारणे थरारक आणि आव्हानात्मकही आहे. आगामी भागांमध्ये, प्रेक्षक तेनालीचे रणनीती रचण्याचे कौशल्य बघतील. त्याच्यासमोर नवी आव्हाने असतील, समोर जुने शत्रू असतील आणि आपल्या राज्याचे रक्षण करण्यासाठी त्याला गुंतागुंतीच्या परिस्थितीतून मार्ग काढायचा आहे. या प्रवासात रहस्य, विनोद आणि नाट्य पुरेपूर भरलेले आहे. प्रेक्षकांना त्याच्या या साहसी प्रवासात अनेक ट्विस्ट अनुभवता येतील.”