
no images were found
“श्रीराम आपल्याला आपल्यातले वाटतात अभिनेता सुजय रेऊ
सोनी सबवरील ‘श्रीमद् रामायण’ मालिकेत श्रीराम (सुजय रेऊ) आणि सीता (प्राची बंसल) यांचे जीवनचरित्र उलगडले आहे. ही मालिका टेलिव्हिजनवर एक वर्ष पूर्ण करत आहे. हे यश साजरे करताना एका खास मुलाखतीत सुजय रेऊ आपल्या या प्रवासाविषयी सांगत आहे. श्रीरामाची शांत आणि धीरगंभीर मूर्ती उभी करण्यापासून ते काही सामर्थ्यशाली क्षण जगण्यापर्यंतचे अनुभव घेताना आपण या भूमिकेत किती समरसून गेलो, ते सांगत आहे, अभिनेता सुजय रेऊ.
गेल्या एक वर्षाचा तुझा प्रवास कसा होता आणि हो मोठा टप्पा पार करताना तुला काय वाटते आहे?
माझा विश्वासच बसत नाहीये की, ही मालिका सुरू होऊन एक वर्ष होऊन गेले! हा खरोखर एक अद्भुत अनुभव होता. इतक्या भव्य मालिकेचा एक भाग होता आले, हे मी माझे भाग्य समजतो. एक अभिनेता म्हणून श्रीरामाची भूमिका करणे ही माझ्यासाठी गौरवाची बाब होती. या भूमिकेशी निगडीत झाल्यामुळे मला प्रेक्षकांचे अपार प्रेम मिळाले आहे. त्यांच्या प्रोत्साहनामुळेच आज हा टप्पा गाठता आला आहे.
सिंहावलोकन केल्यास, या मलिकेतील तुझी आवडती दृश्ये किंवा क्षण कोणते आहेत?
रामायणात असंख्य अद्भुत क्षण आहेत आणि माझ्यासाठी तर जवळजवळ प्रत्येक क्षण खूप खास आणि संस्मरणीय होता. त्यापैकी काही क्षणांची निवड करायची झाल्यास माझे आवडते सर्वात पहिले दृश्य म्हणजे माझी एंट्री झाली, ते दृश्य. या दृश्यात मी गंगा आरती केली होती, आणि पार्श्वभूमीत राम भजन वाजत होते. घाटाच्या पायऱ्या उतरून जाऊन आरती करण्याचा तो अनुभव स्वप्नवत होता. आणि जेव्हा मी फायनल शॉट पाहिला, तेव्हा पडद्यावर मीच आहे, यावर माझा विश्वासच बसत नव्हता. आणखी एक आवडते दृश्य म्हणजे स्वयंवराचे दृश्य. जे खूप छान चित्रित झाले होते. सीता हरणाचा प्रसंग देखील माझा आवडता आहे. सीतेचे अपहरण झाल्याचे श्रीरामाला समजते आणि तो शोकाकुल होतो हा प्रसंग खूप सुंदर मांडला होता. त्यातील बारकावे छान टिपले होते. त्यावेळचे चित्रण नेत्रसुखद होते आणि संगीत भावुक करणारे होते. त्यामुळे ते दृश्य फारच परिणामकारक उतरले होते.
पडद्यावर श्रीराम साकारताना तुझ्यापुढे काही मोठी आव्हाने होती का? तू त्यांच्यावर कशी मात केलीस?
यावर्षी जानेवारीत राम लल्लाची प्राण प्रतिष्ठा होणार होती, आणि त्याच महिन्याच्या सुरुवातीला ही मालिका सुरू होत होती. त्यामुळे ही मालिका कशी असेल आणि श्रीरामाची भूमिका कोण करणार याबद्दल विविध अंदाज बांधले जात होते. प्रत्येक दृश्यात श्रीरामाचे धीरगंभीर, करुणामय, संयमी स्वरूप उभे करणे हे सर्वात मोठे आव्हान होते. चेहऱ्यावरील हावभाव, देह बोली, डोळे यांमधून ते व्यक्त करण्यासाठी प्रचंड एकाग्रता आवश्यक होती. प्रत्येक क्षणात श्रीरामाची आभा प्रकट होण्यासाठी निरंतर कष्ट आणि निष्ठा आवश्यक होती. हवामान ही एक दुसरी अडचण होती. आम्ही कित्येकदा कडक उन्हात समुद्रकिनारी, त्या तापलेल्या वाळूत अनवाणी पायांनी चित्रण केले आहे. ते खूप आव्हानात्मक होते. हे सगळे असले तरी एका अभिनेत्यांसाठी श्रीरामाची भूमिका करायला मिळणे ही एक दुर्मिळ आणि खास संधी असते. त्यामध्ये जबाबदारी आणि मान दोन्ही आहे. त्यामुळे प्रत्येक अडचणीवर मात करताना खूप आनंद मिळत होता.
इतर सह-कलाकारांशी तुझे संबंध कसे आहेत? खास करून लव आणि कुशची भूमिका करणाऱ्या बाल कलाकारांशी?
लव आणि कुश साकारणाऱ्या शौर्य आणि अथर्व या दोघांशी माझे विशेष सख्य आहे. आम्ही जेव्हा एकत्र शूटिंग करतो, तेव्हा सेट्सवरील क्लिप्स पोस्ट करत असतो. ती दोन्ही फार गोड मुले आहेत. नेहमी हसत, खेळत असतात. काम खूप धकाधकीचे असूनही ती मुले कधीच मरगळलेली, दमलेली दिसत नाहीत. दोघेही खूप प्रतिभावान आहेत. त्यांच्यामुळे सेटवर एक चैतन्य असते, ज्यामुळे त्यांच्यासोबत काम करताना नेहमीच मजा येते. पॅक-अप झाल्यानंतर आम्ही बऱ्याचदा एकत्र बॅडमिंटन खेळतो आणि क्रिकेटची मॅचही खेळतो. आमची मस्तच गट्टी जमली आहे आणि त्यांच्यासोबत शूटिंग करताना, गप्पा-टप्पा करताना आणि कामानंतर दंगा करताना खरोखर मजा येते.
श्रीरामाची भूमिका करताना तू काय काय शिकलास?
धैर्य, करुणा, नाती जोडणे, ती निभावणे आणि सगळ्यांना समजून घेणे या गोष्टी मी श्रीराम चारित्रातून शिकलो. संकटांचा सामना कसा करावा हे या कथेमधून शिकता आले. समोर कितीही संकटं आली, तरी श्रीरामाचा तोल कधीच ढळत नाही. तसेच आपल्या तत्त्वांशी तो कधीच तडजोड करत नाही. यामधून आपल्याला शिकवण मिळते की, कठीण प्रसंगी शांत राहणे, आपल्या तत्त्वांशी एकनिष्ठ राहणे आणि योग्य निवड करणे महत्त्वपूर्ण असते.
आजही लोकांना रामायण इतके आवडते याचे तुझ्या मते कारण काय?
श्रीरामाची आपण एक देवता म्हणून पूजा करतो आणि त्याला देव मानतो पण त्याचवेळी तो आपण त्याच्याशी तादात्म्य पावू शकतो, कारण श्रीराम स्वतः एका माणसासारखे आयुष्य जगले आणि आपल्यातील दैवी शक्ती फार क्वचित त्यांनी प्रकट केल्या. स्वतःमध्ये प्रचंड क्षमता असून देखील त्यांनी मानवी जीवन जगण्याचे निवडले, आपल्या आसपासच्या लोकांची उन्नती केली आणि आपल्या कृतीमधून त्यांना मार्गदर्शन केले. श्रीरामांना त्यांच्या जीवनात ज्या अडचणीना तोंड द्यावे लागले, त्या अडचणी आज देखील आपल्याला आसपास दिसतात. सीतेपासून विभक्त होणे असो किंवा वारसा हक्कावरून कुटुंबात होणारे वाद असो हे संघर्ष आजच्या समाजात आणि कुटुंबांत देखील आपल्याला दिसतात. त्यावेळी श्रीरामाने रावणाचा सामना केला त्याप्रमाणे आज देखील वेगवेगळ्या रूपातील ‘रावण’ आपल्याला सामोरे येताना दिसतात.
यापुढे मालिकेच्या कथानकातील कोणत्या गोष्टी प्रेक्षकांना आकर्षित करतील?
श्रीराम आणि सीता हे पुन्हा एकत्र येतील, त्या क्षणासाठी मी उत्सुक आहे. जेव्हा लव आणि कुश श्रीरामाला भेटतील आणि रामाला हे समजेल की, ही दोन्ही त्याचीच मुले आहेत आणि त्यांच्या उल्लेखात येणारी स्त्री म्हणजे प्रत्यक्ष सीता आहे, तो क्षण किती हृदयस्पर्शी असेल! श्रीराम आणि सीता यांचे मीलन हा नक्कीच अविस्मरणीय क्षण असणार आहे. हे दृश्य पडद्यावर कसे साकारते हे बघण्यास मी खूप उत्सुक आहे.