
no images were found
सुशासन हा जगण्याचा मंत्र बनवा – लक्ष्मीकांत देशमुख
कोल्हापूर, : शेतकरी, मागासवर्गीय, गोर गरीब, सर्वसामान्य नागरिक, महिला व बालकांचे मायबाप होवून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य द्या. पारदर्शक काम करा. कामाचा ध्यास घेवून ‘सुशासन हा जगण्याचा मंत्र बनवा,’ असे आवाहन माजी वरिष्ठ प्रशासकिय अधिकारी तथा साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले.
केंद्र सरकारच्या वतीने 19 ते 24 डिसेंबर दरम्यान सुशासन आठवडा साजरा करण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन सभागृहात यानिमित्ताने आयोजित कार्यशाळेत श्री. देशमुख बोलत होते. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, महसूल विभागाचे उपजिल्हाधिकारी डॉ.संपत खिलारी, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता ननावरे तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
श्री. देशमुख म्हणाले, प्रशासन राबविताना संविधानिक मूल्यांची घसरण होऊ देऊ नका. संविधानाला बांधील राहूनच प्रशासकीय काम करा. आपल्या विचारांची, चिंतनाची जोड देवून चांगल्यात चांगले काम करा. वाईट कामांना नकार देवून पारदर्शीपणे प्रशासन राबवा. कार्यालयात येणाऱ्या नागरीकांना भेटीसाठी वेळ राखून ठेवा. त्यांच्याशी संवाद साधून आदराची वागणूक द्या. त्यांचे प्रश्न वेळेत सोडवा. बैठका, दौरे, अभ्यागत भेटींचे योग्य नियोजन करुन त्यानुसार कामे वेळेत पूर्ण करा. महत्वाचे व्यक्ती आणि सामान्य नागरिक या सर्वांना समानतेची वागणूक द्या. कामातून ‘प्रतिभा निर्मिती’ करा. सर्वसमावेशक काम करा. प्रशासकीय कायदे व नियमांचा अभ्यास करुन ते पाळा. वरिष्ठ अधिकारी व सहका-यांसोबत चांगला संवाद राखा. प्रशासनात कार्यरत असताना प्रत्येक काम सुशासन म्हणूनच पार पाडा. योग्य निर्णय घेवून त्या निर्णयाची चोख अंमलबजावणी करा. कमी वेळेत ‘अधिक जलद प्रभावी काम करणं म्हणजे सुशासन’, असे श्री. देशमुख यांनी सांगितले.
श्री देशमुख म्हणाले, प्रशासकीय काम करताना सर्वधर्मसमभाव राखा. संविधानाचा अभ्यास करुन त्यानुसार प्रशासन राबवा. शेतकऱ्यांना सोयी- सुविधा द्या, पीक कर्ज योजनेसह अन्य योजनांचा लाभ द्या तसेच त्यांना कर्ज पुरवठा वेळेत होण्यासाठी कृषी विभाग व लीड बँकेने प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.
श्री शिंदे म्हणाले, कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने आजवर अनेक उपक्रम प्रभावीपणे राबवून राज्यात उत्तम कामगिरी केली आहे. सुशासन सप्ताह देखील यशस्वीपणे राबवावा. लक्ष्मीकांत देशमुख यांनी कोल्हापूर मध्ये जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना “सेव्ह द बेबी गर्ल” सारखे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले होते. उत्तम प्रशासकीय अधिकारी असण्याबरोबरच त्यांनी ज्येष्ठ साहित्यिक म्हणूनही परिचित असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले. आभार सर्वसाधारण शाखेचे तहसीलदार विजय पवार यांनी मानले.