no images were found
गुन्हेगारांच्या राजकीय आश्रयदात्यांना हद्दपार करण्याची गरज-हेमंत पाटील
पुणे, :- कायदाव्यवस्थेचे धिंडवडे काढणाऱ्या घटना गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात घडल्या आहेत.परभणीतील आंदोलनकर्ता सोमनाथ सुर्यवंशी याचा न्यायालयीन कोठडीत झालेला दुदैवी मृत्यू असो अथवा बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील संरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या, या दोन्ही घटना राज्याला हादरवणाऱ्या ठरल्या आहेत. पुढारलेला महाराष्ट्र गुन्हेगारीत बिहारला देखील मागे टाकणार का? असा सवाल गुरुवारी (ता.१९) इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी उपस्थित केला.
गुन्हेगारीला मिळत असलेले राजकीय संरक्षण संपवण्यासाठी आता पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन हेमंत पाटील यांनी केले आहे. गुन्हेगारांच्या राजकीय आश्रयदात्यांना हद्दपार करण्याची गरज त्यामुळे निर्माण झाली असल्याचे देखील पाटील म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात अखेरच्या क्षणी वर्णी लागलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या जिल्ह्यात घडलेल्या या घटनेमुळे अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाली आहेत. मुंडेंचे निकटवर्तीय असलेल्या नेत्याच्या माणसांची नावे देशमुख हत्या प्रकरणात समोर येत असल्याने मारेकऱ्यांना राजकीय स्वरंक्षण होत का? या आरोपांवर सरकारने स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता असल्याचे पाटील म्हणाले.
परळी तालुक्यात गेल्या काळात ३५ हून अधिक हत्या झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. गुन्हेगारीवर त्यामुळे खाकीचा धाक आणि वचक राहीला नाही का ? राजकीय अभय मिळाल्याने गुन्हेगार मोकाट सुटले आहेत का? असे सवाल देखील पाटील यांनी उपस्थित केले आहे. राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू आहे. अधिवेशनातून सरकारने गुन्हेगारी आणि मस्साजोग प्रकरणावर भूमिका स्पष्ट करीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गांभीर्याने हाताळण्याची गरज निर्माण झाली असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले.