
no images were found
भारताने केवळ ३६ चेंडूत मिळवला थायलंडवर विजय
सिल्हेट: महिला आशिया चषकामध्ये भारत विरुध्द थायलंड या सामन्यात भारताने थायलंडचा अवघ्या ६ षटकांत पराभव केला. टीम इंडियाने प्रथम थायलंडच्या संघाला १५.१ षटकांत अवघ्या ३७ धावांत गुंडाळले, त्यानंतर प्रत्युत्तर देत ६ षटकांत ९ धावांनी शानदार विजय मिळवला. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखालील संघाने सामना पूर्णपणे एकतर्फी केला. भारताने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आपले स्थान आधीच निश्चित केले आहे. आता भारताचे ६ सामन्यांत १० गुण झाले आहेत.
पाकिस्तान महिला संघाकडून झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय संघ आजच्या सामन्यासाठी तयारीनिशी उतरला होता. याआधी थायलंडने सलग तीन सामने जिंकले होते. त्यांनी रविवारी मलेशियाचा ५० धावांनी पराभव केला. यापूर्वी, ७ ऑक्टोबर रोजी यूएईचा १८ धावांनी आणि एक दिवस आधी म्हणजेच ६ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानचा ४ विकेटने पराभव केला होता. पण, भारतीय संघाने त्यांचा विजयी रथ रोखला.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकल्यानंतर भारताने महिला टी-२० आशिया चषक स्पर्धेत थायलंडला १५.१ षटकांत ३७ धावांत गुंडाळले. थायलंडचे फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर टिकू शकले नाहीत. त्यांच्याकडून फक्त एक फलंदाज नानपत कोंचनारिओनकाई (१२) दुहेरी अंकापर्यंत पोहोचली. भारताकडून स्नेह राणाने तीन तर राजेश्वरी गायकवाड आणि दीप्ती शर्माने प्रत्येकी दोन गडी बाद केले. मेघना सिंगला एक विकेट मिळाली.
प्रत्युत्तरात लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने ६ षटकांत एक गडी गमावून ४० धावा केल्या आणि विजय मिळवला. त्याच्यासाठी सलामीवीर एस. मेघनाने १८ चेंडूंत ३ चौकारांच्या मदतीने नाबाद २० धावा केल्या. त्याचवेळी शेफाली वर्माच्या रूपाने एकमेव विकेट पडली. ती ६ चेंडूत ८ धावा काढून बाद झाली. दुसरीकडे, पूजा वस्त्राकरने १२ चेंडूत २ चौकारांच्या मदतीने १२ धावा केल्या.
आजच्या सामन्यातील भारताच्या महिला संघाचे नेतृत्व स्मृती मंधाना करत होती आणि हा तिचा १०० वा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना होता. संघाने आपल्या कर्णधाराला शानदार विजयाची नोंद करून आनंद साजरा करण्याची एक उत्तम संधी दिली आहे.