
no images were found
अक्षयला मल्लखांबमध्ये सुवर्णपदक
अहमदाबाद : मल्लखांबमध्ये खेळातील महाराष्ट्राचे वर्चस्व सिद्ध करत महाराष्ट्राच्या अक्षय तरळ याने सुवर्णपदक व शुभंकर खवले याने रौप्यपदक पटकावले. मल्लखांबमध्ये खेळाडूंना पुरलेला, टांगता आणि दोरीच्या तिन्ही प्रकारांमध्ये आपले कौशल्य दाखवावे लागते. या एकूण प्रकारांची एकत्रित कामगिरी लक्षात घेऊनच गुण दिले जातात.
शुभंकर याला २६.७० गुण मिळाले तर मुंबई उपनगरचा खेळाडू अक्षय याने यामध्ये २६.८५ गुण मिळवले; गणेश देवरुखकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत तो खासगी कंपनीत नोकरी करतो. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर त्याने अनेक पदके जिंकली आहेत.
अभिजीत भोसले यांच्या मार्गदर्शनाखालील शुभंकर हा पुण्यातील महाराष्ट्रीय मंडळात प्रशिक्षण घेत आहे. वाणिज्य महाविद्यालयात द्वितीय वर्ष पदवी अभ्यासक्रमात शिकत आहे. त्याला या खेळासाठी महाविद्यालयाकडून नेहमीच प्रोत्साहन मिळाले आहे. आतापर्यंत त्याने राष्ट्रीय स्तरावर पदके जिंकली असून राज्य स्तरावरही त्याने यश मिळविले आहे.