no images were found
ज्ञानज्योती सावित्राबाई फुले आधार योजना व पंडीत दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
कोल्हापूर: शासनाने सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेंतर्गत अर्ज स्विकृतीस दि. 31 जुलै 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तथापि, संचालनालयाने उच्च शिक्षणाचे द्वितीय, तृतीय, चतुर्थ वर्षाकरीता दि. 15 ऑक्टोबर 2024 व उच्चशिक्षणाचे प्रथम वर्षासाठी दि. 30 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु काही अभ्यासक्रमांची प्रवेश प्रकिया सुरु असल्याने विद्यार्थ्यांना विहित वेळेत अर्ज करण्यास शक्य नसल्याने पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेंतर्गत अर्ज स्विकृती व लाभार्थी निवड प्रक्रिया राबविण्याकरीता नमुद वेळापत्रकानुसार मुदतवाढ देण्यात आली असून विद्यार्थ्यांनी दि. 11 नोव्हेंबर 2024 पर्यंत ऑफलाईन पध्दतीने अर्ज इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक सुनिता नेर्लीकर यांनी केले आहे.
इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत राज्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती (क प्रवर्गातील धनगर समाज वगळून ) आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्चशिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांकरीता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सन 2024-25 पासून सुरु करण्यात आली आहे. या योजनेकरीता इयत्ता 12 वी नंतरचे उच्च शिक्षण घेणारा व ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये 2 लाख 50 हजार पेक्षा कमी आहे असे विद्यार्थी पात्र असून जिल्ह्याच्या ठिकाणी उच्चशिक्षण घेणा-या विद्यार्थ्यास प्रतिवर्ष भोजन, निवास व निर्वाह भत्त्यासाठी एकूण 43 हजार रुपये व तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 38 हजार रुपये प्रमाणे लाभाचे वितरण केले जाणार आहे.
उच्च शिक्षणाचे द्वितीय, तृतीय, चतुर्थ वर्षासाठी अर्ज स्विकारण्याचा शेवटचा दिनांक 11 नोव्हेंबर 2024 व निवड यादी जाहिर करण्याचा दिनांक 15 नोव्हेंबर 2024 असा आहे.उच्च शिक्षणाचे प्रथम वर्षासाठी अर्ज स्विकारण्याचा शेवटचा दिनांक 11 नोव्हेंबर 2024 व निवड यादी जाहिर करण्याचा दिनांक 15 नोव्हेंबर 2024 असा आहे.
या दोन योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील 12 वी नंतरचे शिक्षण घेण्याऱ्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या 150, द्वितीय वर्षातील 150, तृतीय वर्षातील 150 व चतुर्थ वर्षात प्रवेश घेतलेल्या 150 विद्यार्थ्यी अशा प्रति जिल्हा 600 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण,कोल्हापूर, डॉ.बाबबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन विचारेमाळ, बाबर हॉस्पीटल जवळ, कोल्हापूर कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही श्रीमती नेर्लीकर यांनी केले आहे.