no images were found
आदर्श आचारसंहितेच्या योग्य अंमलबजावणीसाठी सजग राहून कामकाज करा – अमोल येडगे
कोल्हापूर : निवडणूक प्रक्रियेतील आदर्श आचारसंहितेचे पालन योग्यरित्या होत आहे का नाही याची माहिती येणाऱ्या तक्रारीमधून तसेच माध्यमांतून लक्षात येते. यामुळे तक्रार निवारणमधील आलेल्या तक्रारी वेळेत संबंधित विभागाला कळवून त्या सोडविण्यासाठी सजग राहून कामकाज करा अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. त्यांनी तक्रार निवारण तसेच माध्यम कक्षाला भेट देवून सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी माध्यम कक्षातील नियुक्त अधिकारी कर्मचारी यांनाही त्यांनी सूचना केल्या. ते म्हणाले, माध्यमांमधून निवडणूक प्रक्रियेसंबंधित नकारात्मक बातम्या येतात. तसेच सामाजिक माध्यमांवर फेक न्यूज पोस्ट केल्या जातात तसेच आदर्श आचरसंहितेचे उल्लंघनही पोस्टमधून होण्याची शक्यता असते. त्यामूळे तातडीने अशा पोस्ट, बातम्या निवडणूक विभागाच्या निदर्शनास आणून त्यावर खुलासा द्यावा. या भेटीवेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे, माध्यम कक्षाचे नोडल अधिकारी तथा जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, तक्रार निवारणचे सहायक नोडल प्रसाद संकपाळ व त्या त्या कक्षातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहाच्या इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर स्थापन करण्यात आलेल्या तक्रार निवारण व दुसऱ्या मजल्यावरील माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीच्या माध्यम कक्षाचे कामकाज सुरू आहे. श्री.येडगे यांनी आचारसंहितेच्या अनुषंगाने पेड न्युज, सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियावर बारकाईने नजर ठेवून काम करावे, आक्षेपार्ह मजकूर, जाहिराती याबाबत तातडीने संबंधित यंत्रणेला अवगत करावे, अशा सूचना दिल्या. जिल्ह्यातील सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी समन्वय ठेवावा, मुद्रित दृकश्राव्य व सर्व प्रकारच्या समाज माध्यमावर प्रसारित होणाऱ्या पेड व फेक न्यूज, द्वेष व दिशाभूल करणाऱ्या पोस्ट बातम्यांवर बारीक नजर ठेवावी, तसेच राजकीय पक्ष व त्यांचे उमेदवार यांना समाज माध्यमावर निवडणूक प्रचारा संबंधित जाहिरातीचे प्रमाणिकरण करून घेण्याबाबत कळविण्यात यावे, वृत्तपत्रे, दैनिक साप्ताहिके, मासिक, याचबरोबर दिवाळी विशेषांक यामध्ये प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीवर लक्ष ठेवावे, असेही त्यांनी सुचित केले.
यावेळी माध्यम कक्षाचे नोडल अधिकारी सचिन अडसूळ यांनी निवडणुकीच्या काळात प्रत्येक राजकीय हालचालीवर सायबर सेलच्या कर्मचाऱ्यांमार्फत सोशल मीडियाशी संबंधित सर्व प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवण्यात येत आहे असे सांगितले. तक्रार निवारण कक्षातील सहायक नोडल प्रसाद संकपाळ यांनी यावेळी १९५० टोल फ्री नंबरवर येत असलेल्या विविध तक्रारी, मदत याबाबतची माहिती दिली. तसेच सी-व्हिजील ॲपवर येत असलेल्या तक्रार बाबतच्या कामकाज प्रक्रियेची माहिती व प्रक्रिया जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना दिली.