
no images were found
तापमानवाढ नियंत्रणासाठी हरितवायू उत्सर्जन कमी करण्याची गरज: डॉ. अनिल कुलकर्णी
कोल्हापूर(प्रतिनिधी) : तापमानवाढीमुळे भविष्यात मुंबईसारखी शहरे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. तापमानवाढीवर नियंत्रण आणण्यासाठी हरीतवायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहेत, असे प्रतिपादन ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ या संस्थेमधील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल कुलकर्णी यांनी नुकतेच येथे केले.
शिवाजी विद्यापीठातील हवामान बदल आणि शाश्वत विकास अभ्यास केंद्र, भूगोल आणि पर्यावरणशास्त्र अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘तापमान बदल आणि अनुकूलन उपाय’ या विषयावर आयोजित एक दिवसीय चर्चासत्रात ते बोलत होते. नीलांबरी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यावरणशास्त्र विभागाचे माजी प्रमुख डॉ. प्रकाश राऊत होते.
डॉ. कुलकर्णी यांनी आपल्या व्याख्यानात तापमान बदल आणि मानवी हस्तक्षेप याविषयी सविस्तर माहिती दिली. तापमानवाढीचा हिमालयातील हिमनगांवरील होणारा परिणाम विषद करताना प्राचीन काळापासून तापमानात झालेले बदल आणि सध्या वाढत जाणारे तापमान यावर भाष्य केले. हवामान बदलामुळे होणारे धोक्यांचे स्तर, असुरक्षितता आणि जोखीम यांच्याबद्दल देखील उपस्थितांना अवगत केले. डॉ. कुलकर्णी यांनी तीस वर्षाहून अधिक काळ भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या अंतरिक्ष उपयोग केंद्रामध्ये (सॅक) संशोधन केले आहे.
हवामान बदल आणि शाश्वत विकास अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. सचिन पन्हाळकर यांनी प्रास्ताविक केले, पर्यावरणशास्त्र अधिविभागाच्या प्रमुख डॉ. आसावरी जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमाला भूगोल, पर्यावरण अधिविभागांसह विविध विभागांतील शिक्षक व विद्यार्थ्यानी उपस्थिती दर्शविली.