Home शैक्षणिक भूस्खलनप्रवण क्षेत्रातील जैवविविधतेच्या संशोधनासाठी विद्यापीठास ‘हिसोआ’कडून शास्त्रीय उपकरण मंजूर

भूस्खलनप्रवण क्षेत्रातील जैवविविधतेच्या संशोधनासाठी विद्यापीठास ‘हिसोआ’कडून शास्त्रीय उपकरण मंजूर

18 second read
0
0
25

no images were found

भूस्खलनप्रवण क्षेत्रातील जैवविविधतेच्या संशोधनासाठी विद्यापीठास ‘हिसोआ’कडून शास्त्रीय उपकरण मंजूर

 

कोल्हापूर(प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठामध्ये भूस्खलनप्रवण क्षेत्रातील जैवविविधतेच्या अनुषंगाने सुरू असलेल्या संशोधन प्रकल्पाला हिसोआ या अग्रगण्य मोबाईल कंपनीकडून औद्योगिक सामाजिक दायित्वाअंतर्गत (सी.एस.आर.) निधीतून शास्त्रीय उपकरण मंजूर करण्यात आले आहे.

शिवाजी विद्यापीठातील वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. मानसिंगराज निंबाळकर यांना पुण्याच्या ऊर्मी या संस्थेकडून सन २०२४-२५साठी ‘कोल्हापूर परिसरातील घाटातील भूस्थलन प्रवण क्षेत्रातील जैवविविधतेचा शास्त्रीय अभ्यास’ हा अत्यंत महत्त्वाचा संशोधन प्रकल्प मंजूर झाला आहे. या संशोधन प्रकल्पासाठी पुणे येथील मोबाईल क्षेत्रातील अग्रणी कंपनी हिसोआ इलेक्ट्रॉनिक प्रा.लि. पुणे यांच्या सीएसआर निधीअंतर्गत मल्टिमोडल रिडर हे उपकरण मंजूर झाले आहे.

डॉ. निंबाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या उपकरणाच्या सहाय्याने एकाचवेळी विविध ९६ नमुन्यांची चाचणी करणे शक्य होणार असून अॅबसॉर्बन्स फ्लुओरेसन्स आणि ल्युमिनसन्स यांच्यासह इतर घटक मोजण्याची क्षमताही या उपकरणात आहे. वनस्पतींची मुळे व जमीन यांच्यातील संबंधांचा भूस्खलनाच्या अनुषंगाने अभ्यास करण्यासाठी या उपकरणाची मदत होणार आहे.

सदर प्रकल्पांतर्गत कोल्हापूर ते कोकणाला जोडणाऱ्या पश्चिम घाटातील अणुस्कूरा, करुळ आणि फोंडा या तीन प्रमुख घाट रस्त्यांचा भूस्खलनाच्या संदर्भात अभ्यास केला जाणार आहे. कोणती झाडे उतारांना स्थिर करतात आणि मुळांच्या माध्यमातून मातीची धूप रोखतात, हे समजून घेण्यासाठी हा अभ्यास उपयुक्त ठरणार आहे. भूस्खलनाची जोखीम कमी करण्यासाठी उपयुक्त असलेल्या वनस्पतींच्या प्रजाती ओळखण्यासाठी देखील हे संशोधन उपयुक्त ठरेल. तसेच भूस्खलनानंतर जमिनीचा उतार दुरुस्त करण्याच्या उपाययोजनांमध्ये त्याचा उपयोग होईल, असे डॉ. निंबाळकर यांनी सांगितले.

‘हिसोआ’चे सामाजिक दायित्व

हिसोआ इलेक्ट्रॉनिक प्रा.लि., पुणे ही मोबाईल क्षेत्रातील अग्रणी कंपनी असून सन २०२१-२०२२ पासून कोल्हापूर, चिपळूण परिसरातील पूरग्रस्तांना मदत, गतिमंद मुलांच्या अनाथाश्रमांना मदत, जिल्हा परिषदेच्या शाळांना सुलभ शौचालय सुविधा उभारणी, डिजिटल शैक्षणिक सुविधा पुरवठा यांसह अनेकविध समाजोपयोगी कार्यांमध्ये सक्रीय आहे. पुण्याच्या ऊर्मी संस्थेचे सचिव सचिन गोडसे यांच्या विशेष प्रयत्नांतून हा प्रकल्प आणि तदअनुषंगिक उपकरणे शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र अधिविभागास प्राप्त होत आहेत, असेही डॉ. निंबाळकर यांनी सांगितले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

‘आय.आय.एस.सी.’सोबत शिवाजी विद्यापीठ राबविणार संयुक्त संशोधन प्रकल्प

  ‘आय.आय.एस.सी.’सोबत शिवाजी विद्यापीठ राबविणार संयुक्त संशोधन प्रकल्प   कोल्हापू…