
no images were found
मनोज जरांगेंच्या सुरक्षेसाठी ओबीसी समाज सदैव तत्पर-हेमंत पाटील
मुंबई: राज्यात मराठा आरक्षणासाठी सामाजिक क्रांतीची मशाल पेटवणारे मनोज जरांगे पाटील यांच्या पाठिशी अवघा ओबीसी समाज उभा आहे. वेळ पडली तर जरांगेंच्या सुरक्षेसाठी आपल्या छातीचा कोट करून ओबीसी बांधव त्यांच्यासाठी लढतील, असे सुतोवाच इंडिया अगेन्स्ट करप्शनचे (आयएसी) राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी शुक्रवारी (ता.२५) केले. यूट्यूबच्या कमेंटबॉक्समध्ये कमेंट करीत जरांगेना धमकी देणाऱ्या अज्ञाताला पोलिसांनी तात्काळ बेड्या ठोकण्याचे आवाहन देखील पाटील यांनी केले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जरांगे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलेली असली तरी, ओबीसी बांधव त्यांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर आहेत, असे पाटील यांनी स्पष्ट केले.जरांगे आपल्या प्राणाची चिंता न करता मराठा आरक्षणाच्या आंदोलनात टिकून आहेत. ते असल्या धमक्यांना भीक घालत नाहीत. त्यांच्या केसाला जरी धक्का लावायचा असेल तर हल्लेखोरांना १० मिनिटेच काय १० दशके विचार करावा लागेल, असा इशारा पाटील यांनी धमकी देणाऱ्या अज्ञाताना दिला आहे.
केवळ दहशत माजवण्यासाठी ‘बजाज बिश्नोई लीडर’ नावाचा वापर करून अशा प्रकारचा खोडसरपणा केला जात असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले. धमकी देणाऱ्या अज्ञाताना जोपर्यंत अटक केली जात नाही, तोपर्यंत मराठा-ओबीसी बांधव गप्प बसणार नाही, असा इशारा देखील पाटील यांनी दिला. वैचारिक लढाई ही विचारांनीच लढवावी लागते, हिंसाचाराने परिवर्तन होत नाही,असे मत हेमंत पाटील यांनी व्यक्त केले.