
no images were found
सब ज्युनिअर कोल्हापूर जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा
कोल्हापूर :- चेस असोसिएशन कोल्हापूरच्या मान्यतेने अनयाज् चेस क्लब ने आयोजित केलेल्या कोल्हापूर जिल्हा सब-ज्युनिअर (पंधरा वर्षाखालील) मुला-मुलींच्या निवड बुद्धिबळ स्पर्धा आज मोठ्या उत्साहात सुरू झाल्या.
इचलकरंजी जयसिंगपूर गडहिंग्लज वारणानगर व स्थानिक कोल्हापुरातील नामवंत साठ बुद्धिबळपटू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत यापैकी अकरा बुद्धिबळपटू आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त आहेत. मुले आणि मुलींच्या स्वतंत्र गटात होत असलेल्या या स्पर्धा स्विस लीग पद्धतीने जलद बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार घेण्यात येत आहेत. मुलांच्या गटात सहा फेऱ्या होणार आहेत तर मुलींच्या गटात पाच फेऱ्या होणार आहेत.
या स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते सुधीर राणे उद्योजक प्रशांत गांधी व प्रतिमा गांधी यांच्या हस्ते बुद्धिबळाच्या पटावर चाल करून करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव व आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले, मनिष मारुलकर, धीरज वैद्य, अनिश गांधी, उमेश पाटील, आरती मोदी अभिजीत चव्हाण व अर्पिता दिवाण उपस्थित होते. खेळाडूंनी व पालकांनी झटपट यश मिळवण्याच्या पाठीमागे न लागता संयमाने दीर्घकाळ मेहनत केल्यास हमखास यश मिळते व जीवनात प्रगती होते असे खेळाडू व पालकांना मार्गदर्शन करताना प्रतिमा गांधी यांनी आपले मत व्यक्त केले.. ़
आज झालेल्या मुलांच्या चौथ्या फेरीनंतर द्वितीय मानांकित जांभळी चा अभय भोसले, तृतीय मानांकित गडहिंग्लज चा स्वरूप साळवे व सातवा मानांकित कोल्हापूरचा राजदीप पाटील हे तिघेजण चार गुणासह संयुक्तपणे आघाडीवर आहेत. अग्रमानांकित कोल्हापूरच्या वेंकटेश खाडे पाटील सह एकूण दहा जण दोन गुणासह संयुक्तपणे द्वितीय स्थानावर आहेत. मुलींच्या गटात तिसऱ्या फेरीनंतर द्वितीय मानांकित नोंदणीची संस्कृती सुतार तीन गुणांसह आघाडीवर आहे. अग्रमानांकित कोल्हापूरची अरिना मोदी व तृतीय मानांकित नांदणीची सिद्धी बुबणे या दोघीजण अडीच गुणासह संयुक्तपणे द्वितीय स्थानावर आहेत. या स्पर्धेतून चार मुलांची व सहा मुलींची निवड नाशिक येथे 18 ते 20 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे.