no images were found
दुचाकीचे चाक पंक्चर झाल्याने दोन ठार, दोघे जखमी
कोल्हापूर : दसऱ्यासाठी एकाच दुचाकीवर चिमुरड्यासह चौघेजण घरी जात असताना पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सौंदलगा हद्दीत कुर्ली फाट्यावजळ झालेल्या अपघातात एका महिलेसह अल्पवयीन मुलीचा करुण अंत झाला. या घटनेत दुचाकीस्वार आणि एक चिमुरडा मुलगा गंभीर जखमी झाला.
चौघेजण दुचाकीवर जात असतानाच मागील टायर पंक्चर होऊन हा अपघात घडला. अपघातातील मृत व जखमी हे एकमेकांचे नातेवाईक असल्याने शोककळा पसरली आहे.
लक्ष्मी आनंद कोप्पद (वय 25, रा. मुगळीहाळ ता. सौंदत्ती, जि. बेळगाव), भाग्यश्री सागर वाकमी (वय13, रा. कटकोळ, ता. रामदुर्ग) असे मयत झालेल्या दोघींची नावे आहेत. हणमंत व्यंकाप्पा सक्री (वय 23) आणि मारुती रमेश चुनामदार (वय 6, रा. गोरमगोळ ता. सौंदत्ती जि. बेळगाव) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.
जखमी व मृत बांधकाम मजूर असून ते कोल्हापूर शहरातील संभाजीनगर परिसरात वास्तव्यास आहेत. जखमी हणमंत हा नातेवाईक असलेल्या लक्ष्मी कोप्पद, भाग्यश्री वाकमी आणि चिमुरडा मारुती चुनामदार या तिघांना घेऊन आपल्या मूळगावी दसरा सणासाठी जात असताना कुर्ली फाट्याजवळ मागील चाक पंक्चर झाले. त्यामुळे हणमंतचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने बाजूला असलेल्या संरक्षक खांबाला जाऊन धडकल्याने चौघेही रस्त्यावर कोसळले.
त्यामुळे भाग्यश्रीचा जागीच मृत्यू झाला, तर इतर तिघे गंभीर जखमी झाले. लक्ष्मीची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी कोल्हापूरला नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. हणमंत व चिमुरड्या मारुतीवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.