
no images were found
विद्यापीठात आज ‘गोंधळ’चे स्क्रीनिंग आणि लघुपट निर्मितीवर मार्गदर्शन
कोल्हापूर( प्रतिनिधी):शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागात दि. 26 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 3 वाजता मुकुंद खुपेरकर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘गोंधळ’ या शॉर्ट फिल्मचे स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले आहे. याचवेळी खुपेरकर लघुपट निर्मितीचे तंत्र या विषयावर उपस्थितांशी संवाद साधणार आहेत.
गोंधळ या लघुपटाला विविध फेस्टिवलमध्ये पुरस्काराने गौरवण्यात आले. यात संभाजीनगर फेस्टिवल, सेव्हन कलर्स फेस्टिवल, रोशनी फेस्टिवल या सोहळ्यांचा समावेश आहे. गावच्या परंपरेनुसार गोंधळ घालण्याच्या धार्मिक विधी करणाऱ्या कुटुंबातील कर्ता पुरुष व्यसनाचा बळी ठरतो. पुढे त्याची पत्नी आपल्या हक्कासाठी व्यवस्थेशी संघर्ष करते, या विषयावर हा लघुपट बनवण्यात आला आहे. लघुपटाची पटकथा खुपेरकर यांनीच लिहिली आहे. ऋषिकेश कुलकर्णी यांचे संगीत, शर्वरी खुपेरकर यांचे कला दिग्दर्शन असलेल्या या लघुपटात अस्मिता खटावकर, सचिन मोरे यांच्या भूमिका आहेत. स्क्रिनिंगवेळी मुकुंद खुपेरकर लघुपटाची निर्मिती तंत्र या विषयावर साधणार आहेत. हे स्क्रीनिंग सर्वांसाठी मोफत आणि खुले आहे. स्क्रीनिंगमध्ये आणि त्यानंतरच्या चर्चेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मास कम्युनिकेशन आणि बी. ए. फिल्म मेकिंगचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी केले आहे.