Home सामाजिक तब्बल ५ लाख रूपयांची बक्षिसे असलेल्या झिम्मा-फुगडी स्पर्धेचे आयोजन

तब्बल ५ लाख रूपयांची बक्षिसे असलेल्या झिम्मा-फुगडी स्पर्धेचे आयोजन

8 second read
0
0
16

no images were found

तब्बल ५ लाख रूपयांची बक्षिसे असलेल्या झिम्मा-फुगडी स्पर्धेचे आयोजन

कोल्हापूर(प्रतिनिधी): धनंजय महाडिक युवाशक्ती महिला आघाडी प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्यावतीने दरवर्षी पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठया झिम्मा फुगडी स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदा १५ व्या वर्षी बुधवार दि. २५ सप्टेंबर २०२४ रोजी, मार्केट यार्डमधील रामकृष्ण मल्टीपर्पज लॉन येथे झिम्मा – फुगडीसह महिलांच्या पारंपारिक खेळांच्या स्पर्धा रंगणार आहेत. या स्पर्धेसाठी तब्बल ५ लाख रुपयांची आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तसेच स्पर्धेमध्ये युवतींचा सहभाग वाढावा आणि युवतींनाही स्पर्धेत आपल्या कलागुणांचे प्रदर्शन घडवता यावे, याकरता १२ ते १८ वयोगटातील युवतींसाठी ५० हजार रुपये बक्षिसांची वेगळी सांघिक झिम्मा स्पर्धा घेतली जाणार आहे, अशी माहिती भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
धनंजय महाडिक युवाशक्ती महिला आघाडी प्रेरित, भागीरथी महिला संस्था, गेल्या १४ वर्षापासून महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी, झिम्मा फुगडी स्पर्धेचे आयोजन करते. खासदार धनंजय महाडिक आणि भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा प्रचंड यशस्वी आणि लोकप्रिय बनली आहे. स्पर्धेला प्रत्येक वर्षी महिला भगिनींचा प्रतिसाद वाढत आहे. यावर्षीही होणार्‍या स्पर्धेत झिम्मा, घागर घुमविणे, उखाणे, सूप नाचविणे, काटवट काणा, छुई फुई, जात्यावरील ओव्या, फुगडी, घोडा घोडा आणि पारंपारिक वेशभूषा अशा गटांमध्ये ही स्पर्धा होत असून, या स्पर्धेसाठी पहिल्या क्रमांकाच्या संघाला २५ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह, दुसर्‍या क्रमांकासाठी २० हजार रुपये आणि सन्मानचिन्ह, तिसर्‍या क्रमांकासाठी १५ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह, तर चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या क्रमांकासाठी ५ हजार एक रुपये आणि सन्मानचिन्ह तसंच ५०१ रुपयांपासून ५ हजार रुपयांपर्यंतची वैयक्तिक बक्षिसे दिली जाणार आहेत. तसंच १२ ते १८ वयोगटातील मुलींसाठी खास ५० हजार रुपये बक्षिसांचा वेगळा सांघिक झिम्माही आयोजित करण्यात आला आहे. सहभागी सर्व महिलांसाठी चहा, नाष्टा आणि जेवणाची सोय करण्यात आली आहे. त्यासाठी सहजसेवा ट्रस्टचे सहकार्य लाभले आहे. नेहमीच्या दिनच्रकात गुरफटलेल्या महिलांना विरंगुळा मिळावा, त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळावा आणि मराठी संस्कृतीचे जतन व्हावे, यादृष्टीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील खेळामुळे शरीराचा व्यायाम होण्याबरोबरच सांघिक भावना आणि आत्मविश्‍वासामध्ये वाढ होत असल्यामुळे, जास्तीत जास्त महिलांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असा भागीरथी महिला संस्थेचा प्रयत्न असतो. त्याला जिल्हयातील शहरी आणि ग्रामीण भागातील हजारो महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळतो, असे सौ. अरूंधती महाडिक यांनी सांगितले. गेल्या १४ वर्षांत युवती आणि महिलांसाठी कळी उमलताना… हा प्रबोधनात्मक उपक्रम, मोफत शेळी वाटप, मोफत आरोग्य शिबिर, मोफत हेल्मेट वाटप, वृक्षारोपण, महिलांसाठी रोजगारपूरक मोफत प्रशिक्षण, बचत गटांना मोफत स्टॉल, मिस आणि मिसेस भागिरथी स्पर्धा, युवतींसाठी मोफत स्वसंरक्षण शिबिर, रक्तदान शिबिर, वाचनाची सवय वाढीला लागावी, यासाठी गावोगावी वाचनालय सुरू करणे असे उपक्रम राबवण्यात आले आहेत. हजारो महिला आणि युवतींना या उपक्रमाचा लाभ मिळाला आहे, असे सौ. महाडिक यांनी सांगितले. यावर्षी स्पर्धेचे फॉर्म भरण्याची सोय तालुकानिहाय प्रतिनिधींकडे आणि भागीरथीच्या ताराराणी चौकातील कार्यालयामध्ये उपलब्ध आहे. शुक्रवार २० सप्टेंबर २०२४ ही फॉर्म भरून देण्याची अंतिम तारीख आहे. स्पर्धेसाठी सुमारे ४० परीक्षक, १५ निवेदिका आणि ६० स्वयंसेविकांची टीम सज्ज आहे. या स्पर्धेचा आनंद घरबसल्या लुटता यावा, यासाठी चॅनल बी च्यावतीने संपूर्ण स्पर्धेचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेमध्ये सहभागी महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध टिव्ही मालिकांमधील लोकप्रिय कलाकारांसह काही चित्रपट कलाकार या स्पर्धेत उपस्थिती लावणार आहेत.स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी ०२३१- २६२५५७७ किंवा ९०७५२१७७८८ या क्रमांकाशी संपर्क साधावा, असे आवाहन सौ. अरुंधती महाडिक यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला सौ. वैष्णवी महाडिक, सौ. मंजिरी महाडिक उपस्थित होत्या.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…