no images were found
मोक्कांतर्गत कारवाई : शंभूराज देसाई
मुंबई : गोव्यातून दारु तस्करी करणाऱ्यांवर आता कडक कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे. एकच व्यक्ती तीनवेळा अशा प्रकरणात दोषी आढळल्यास त्या व्यक्तीवर मोक्का अंतर्गत कारवाई केली जाणार असल्याचे देसाई म्हणाले.
गोव्यातून विनापरवाना आणल्या जाणाऱ्या मद्य वाहतुकीला चाप लावण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे देसाई म्हणाले. याबाबत कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचनादेखील देण्यात आल्या आहेत.पुढे बोलताना देसाई म्हणाले की, गोवा राज्याला त्यांच्या राज्यात परमिट देण्याचा अधिकार आहे. मात्र, त्याचा अर्थ आपल्या राज्यात परमिट देण्याचा अधिकार गोवा सरकारला नाही. त्यामुळे जर त्यांना दारु घ्यायची आहे त्यांनी गोव्यात ती घ्यावी मात्र, ती राज्यात आणू नये. जर, एखाद्या व्यक्तीकडून तीन वेळा जर अशा पद्धतीचा गुन्हा घडला तर त्यावर मोक्का लावता येईल का? हे तपासून त्यांच्यावर मोक्का लावला जाईल असे देसाई यांनी यावेळी स्पष्ट केले.
तसेच तात्पुरत्या स्वरुपासाठी चेकपॉइंट्स उभारण्याच्या संदर्भात सूचनादेखील अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे देसाई म्हणाले. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यात दारु तस्करीचे प्रमाण कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.