no images were found
विद्यार्थ्यांनी संविधानातील शास्त्रीय मुल्ये जोपासली पाहिजेत -प्रा. श्रीकृष्ण महाजन
कोल्हापूर (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांनी संवैधानिक मूलभूत हक्कांबरोबरच कर्तव्येसुद्धा अंगिकारली पाहिजेत. भारतीय संविधानामध्ये अधोरेखित केलेला शास्त्रीय दृष्टीकोन विद्यार्थ्यांनी स्वीकारला तरच भारत एक विकसित म्हणून पुढे येईल असे प्रतिपादन अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी केले. ते शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिक वंचितता व समावेशक धोरण अभ्यास केंद्राच्यावतीने आयोजित विद्यार्थांसाठी आयोजित करण्यात आलेल्या “स्व: विकास” कार्यक्रमाच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. त्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उदघाटन झाले. यावेळी प्रसंगी श्रीमती डॉ. सी. पी. सोनकांबळे व डॉ. अमोल मिणचेकर उपस्थित होते. श्री. अविनाश भाले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. किशोर खिलारे यांनी आभार मानले.
अभ्यास केंद्राच्यावतीने विद्यापीठातील वंचित समाजातील विद्यार्थांचे आत्मभान जागृत होवून त्यांचा ‘स्व’ विकास झाला पाहिजे या उद्देशाने या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रामध्ये ‘स्व: विकास’ या विषयावर डॉ. अमोल मिणचेकर यांनी मांडणी केली. यावेळी डॉ. सी. पी. सोनकांबळे सत्राध्यक्षा होत्या. तर दुसऱ्या सत्रामध्ये ‘वंचित विद्यार्थांचे आत्मभान आणि समस्या’ या विषयांवर डॉ. विलास सोयम यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. पी. के. गायकवाड सत्राध्यक्ष होते. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या तिसऱ्या सत्रामध्ये श्री. अविनाश भाले यांनी विद्यार्थ्यांशी सवांद साधून त्यांच्या प्रतिक्रिया घेत त्यांना बोलते केले व प्रशिक्षण कार्यक्रमाचा कृतीआराखडा तयार केला.
या प्रशिक्षण कार्यक्रमास विद्यापीठ अधिविभागातील विद्यार्थी व संशोधक सहभागी झाले होते. डॉ. किशोर खिलारे, श्री. शरद पाटील व श्री. अविनाश वाघमारे इत्यादींनी या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी परिश्रम घेतेले.