no images were found
३ ऑक्टोंबर रोजी भूलतज्ञ संघटना अमृतमहोत्सव
कोल्हापूर : देशव्यापी भूलतज्ज्ञ संघटना यावर्षी आपला अमृतोत्सव साजरा करत आहे. कोल्हापूर भूलतज्ञ संघटना ही त्या संघटनेचाच एक भाग आहे. 16 ऑक्टोबर हा दिवस जागतिक भुलशास्त्र दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो. 16 ऑक्टोबर 1846 साली विल्यम थॉमस ग्रीन मोर्टन या डॉक्टरांनी जगातील पहिली भूल इथर या औषधाने दिली. ही भूल अमेरिकेतील बोस्टन या शहरांत दिली गेली. या दिवशी जनजागृती करण्यासाठी या कार्यक्रमाची सुरुवात म्हणून भुलशास्त्र जनजागृती मशाल सर्व महाराष्ट्रात फिरवून नंतर दिल्ली येथे पाठवली जाईल. याप्रमाणे कोकण वरुन येणारी मशाल रत्नागिरीमार्गे कोल्हापूर येथून पुढे सांगली येथे जाणार आहे. त्या निमित्त कोल्हापूरमध्ये दिनांक ३ ऑक्टोबर रोजी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यामध्ये ही ज्योत सीपीआर हॉस्पिटल, दसरा चौक, ताराराणी पुतळा मार्गे डॉ.डी. वाय.पाटील मेडिकल कॉलेज येथे आणण्यात येईल. कोल्हापूर भूलतज्ञ संघटना या ज्योतीचे ३ आक्टोबर रोजी कोल्हापूर मध्ये स्वागत करणार आहे. अशी माहिती भूलतज्ञ संघटनेच्या अध्यक्षा डॉ. रश्मी चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
त्या दिवशी कोल्हापूरातील प्रसिद्ध स्थळांवर म्हणजे दसरा चौक, छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पीटल, रंकाळा, राजर्षी शाहू महाराज समाधी स्थळ, नवा राजवाडा येथे जनजागृती संदर्भात कार्यक्रम करण्यात येणार आहे. ज्यामध्ये भूलशास्त्र व भूलतज्ञ विषयक माहिती देऊन लोकांना भुलशास्त्राचे महत्त्व सांगणे हा उद्देश असेल. इथुन पुढे ही ज्योत डी. वाय.पाटील हॉस्पीटलला येईल. येथे जनजागृती संदर्भात चर्चासत्र आयोजित केले आहे. येथे जीवन संजीवनीचे प्रात्याक्षिक दिले जाईल व त्याच बरोबर कार्यक्रमाची सांगता करण्यात येईल. इथून पुढे ज्योत दिल्लीसाठी रवाना होईल. पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष डॉ.शिवाजी जाधव,डॉ. शितल देसाई, डॉ .संदिप कदम, डॉ. अमोल कोडोलीकर, डॉ.एम. ए. शिर्के, डॉ. किरण भिंगार्डे, डॉ. मारुती पोवार उपस्थित होते.