no images were found
महापालिकेच्यावतीने पथनाट्य, बचत गटाचे स्टॉल व विविध कार्यक्रम संपन्न
कोल्हापूर : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअंतर्गत महापालिकेच्यावतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी या उपक्रमाअंतर्गत महापालिकेच्या विठ्ठल रामजी शिंदे चौकात पथनाट्य, सेल्फी पॉईंट, तिरंगा कॅनवास स्वाक्षरी मोहिम, बचत गटांमार्फत विविध स्टॉलचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान सकाळी महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्यावतीने शहरातील बिंदू चौक येथून महापालिकेपर्यंत तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. यानंतर महापालिकेच्या विठ्ठल रामजी शिंदे चौकात सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी मी आपला तिरंगा ध्वज फडकवेन. स्वातंत्र्य सैनिक व वीर हुतात्मे यांच्या भावनेचा सन्मान करेन आणि भारताच्या विकास आणि प्रगतीसाठी स्वत:ला समर्पित करेन अशी शपथ घेतली. यानंतर के.एम.सी.कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी महापालिकेच्या विठ्ठल रामजी शिंदे चौकात मतदार जानजागृती पथनाटय सादर केले. हे पथनाट्य संपल्यानंतर प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते तिरंगा कॅनवासवर भारत माता की जय लिहून स्वाक्षरी अभियान सुरु केले. दिवसभर हे स्वाक्षरी अभियान सुरुच होते. याच ठिकाणी बचत गटांच्या माध्यमातून स्वातंत्र्य दिना साठी लागणाऱ्या साहित्यांची, वस्तूंची विक्री, विविध प्रजातीची रोपे, कोल्हापूरी चप्पल अशा विविध वस्तूंचे स्टॉल लावण्यात आले. या स्टॉलचे उद्घघाटन प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी महापालिकेच्या अधिकारी, कर्मचा-यांबरोबरच शहरातील सर्व नागरीकांनी आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवावा असे आवाहन केले आहे.
यावेळी प्रशासक के.मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उप-आयुक्त साधना पाटील, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, के.एम.सी.कॉलेजचे प्राचार्य बाबासो उलपे, मुख्य लेखा परीक्षक कलावती मिसाळ, नगरसचिव सुनिल बिद्रे, उप-शहर अभियंता सतीश फप्पे, रमेश कांबळे, रवका अधिकारी प्रशांत पंडत, आस्थापना अधिक्षक राम काटकर, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, महिला व बालकल्याण अधीक्षक सौ.प्रिती घाटोळे, शिक्षक, विद्यार्थी, अधिकारी व कर्मचारी, उपस्थित होते.