
no images were found
हर घर तिरंगा अभियानांतर्गत शाळांमध्ये रांगोळी स्पर्धा उत्साहात संपन्न
कोल्हापूर : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव राज्यात व देशात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. दिनांक 09 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2024 या कालावधीत महापालिकेच्यावतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महापालिकेच्या वतीने शहरात आज शाळास्तरावर रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
‘हर घर तिरंगा’ अभियानाची अंमलबजावणी महानगरपालिका प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनानुसार व उपायुक्त साधना पाटील यांच्या निर्देशानुसार प्राथमिक शिक्षण समितीच्यावतीने प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. मंगळवारी, महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील महापालिका व खाजगी शाळेतील सुमारे 290 शाळामधून रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्कृष्ट व आकर्षक रांगोळी काढून आपल्यातील कलेचा आविष्कार सादर केला.
दिनांक 13 ते 15 ऑगस्ट 2024 या कालावधीत सर्व शाळांतील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी आपल्या शाळेत व घरावर तिरंगा ध्वज फडकवणार आहेत. याची सुरुवात आजपासून झालेली असून घरोघरी तिरंगा फडकवित असल्याचे दिसून येत आहे. या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन अधिकारी आर. व्ही. कांबळे यांची कल्पकता तसेच सहा. प्रकल्प अधिकारी रसूल पाटील, शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे, विजय माळी, उषा सरदेसाई यांचे शाळांना सहकार्य लाभले आहे.
बुधवार, दि.14 ऑगस्ट 2024 रोजी हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत महापालिकेमार्फत सकाळी 10 वाजता बिंदू चौक येथून टू-व्हिलर बाईक द्वारे तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. हि रॅली बिंदू चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महापालिका मुख्य इमारत असा रॅलीचा मार्ग करण्यात आला आहे. तसेच अग्शिमन विभागाच्यावतीने कावळा नाका येथून बाईकद्वारे रॅली काढण्यात येणार आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या मुख्य चौकात बुधवार, दि.14 ऑगस्ट रोजी बचत गटाच्या माध्यमातून झेंडे, तिरंगा बॅच व इतर वस्तूंचे स्टॉल महापालिकेच्या विठ्ठल रामजी शिंदे चौकात सकाळी लागण्यात येणार आहे.