no images were found
कोल्हापुरात राष्ट्रवादी अजित पवार गटाचा बूथ समन्वयक पदाधिकारी मेळावा उत्साहात
कोल्हापूर ( प्रतिनिधी) : -ज्यांनी आपल्या सत्ता काळात राज्यातील महिला भगिनींना दीड रुपया दिला नाही, याउलट आम्ही तब्बल 46 हजार कोटी रुपयांची तरतूद करून लाडक्या बहिणींना महिन्याला दीड हजार रुपयांची तरतूद केली,,, दीड हजारात काय होतंय, अशी टीका करणाऱ्यांनी याचा विचार करावा अशी उपरोधिक टीका करत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या टीकेला कोल्हापुरात बोलताना उत्तर दिले.
अजितदादा पवार, पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लेकर, माजी जिल्हा कार्याध्यक्ष मानसिगराव गायकवाड, विद्यमान जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे, शहराध्यक्ष आदिल फरास, विठ्ठल चोपडे, जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचा हा मेळावा उत्साहात झाला.
यावेळी बोलताना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीसोबत लढतांना जिल्ह्यातील किमान पाच ते सहा जागा लढवण्याचा मनसूबा व्यक्त केला. शहराध्यक्ष आदिल फरास यांनी दोन वेळच्या अन्नाला मोताद असणाऱ्या राज्यातील महिला भगिनींना अजितदादा पवारांनी मासिक दीड हजाराची ओवाळणी रक्षाबंधनाचा मुहूर्त साधून केल्याचे सांगितले. तमाम आया बहिणी याची जाण ठेवून अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी पक्षाला विधानसभा निवडणुकीत भरभरून मतदान करतील, असा आशावाद फरास यांनी व्यक्त केला. यावेळी पक्षातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. स्वागत प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील – असुर्लेकर यांनी केले. जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे यांनी आभार मानले.
या कार्यक्रमात शहराध्यक्ष आदिल फरास आणि महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ शीतल फराकटे यांनी केलेल्या आक्रमक भाषणाना उपस्थित कार्यकर्त्यांचा प्रतिसाद लाभला