no images were found
20 ऑगस्ट 2024 रोजी पर्यंत नवीन मतदार नोंदणी करता येणार प्रारुप मतदार यादी प्रसिध्द
कोल्हापूर : मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या सुचनेनुसार ज्या मतदान केंद्रामध्ये 1400 पेक्षा जास्त मतदार आहेत अशा मतदान केंद्रांचे अन्य लगतच्या,नवीन मतदान केंद्रात विलीणीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे पुर्वीच्या 311 मतदान केंद्रामध्ये नवीन 4 मतदान केंद्रांची वाढ होवून एकुण 315 मतदान केंद्रे तयार झाली आहेत. दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यामध्ये पुरुष मतदार 1 लाख 46 हजार 116, स्त्री मतदार 1 लाख 48 हजार 293 व तृतीयपंथी मतदार 18 असे एकुण 2 लाख 94 हजार 427 इतक्या मतदारांचा मतदार संघात समावेश झाला असल्याची माहिती मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (महसूल) डॉ. संपत खिलारी यांनी दिली आहे.
आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडून दिनांक 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (दुसरा) जाहीर करण्यात आला आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणजे मतदान केंद्रांचे सुसुत्रीकरण करण्याच्या अनुषंगाने 276 कोल्हापूर (उत्तर) विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण करण्यात आले आहे.
20 ऑगस्ट 2024 रोजी पर्यंत नवीन मतदार नोंदणी करता येणार आहे. तसेच दिनांक 10 ऑगस्ट 2024 (शनिवार), दिनांक 11 ऑगस्ट 2024 (रविवार) व दिनांक 17 ऑगस्ट (शनिवार) व दिनांक 18 ऑगस्ट 2024 (रविवार) या चार दिवशी मतदान केंद्रावर मतदार नोंदणीच्या अनुषंगाने विशेष मोहिमेच्या अनुषंगाने शिबीरे घेण्यात येणार आहेत. या मोहिमेमध्ये दिनांक 01 ऑक्टोबर 2024 पर्यंत 18 वर्षे पूर्ण होणार आहेत अशा युवा मतदारांना तसेच मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांना मतदार नोंदणी करता येणार आहे. तसेच मतदाराचे नाव, पत्ता व वय इत्यादीमध्ये दुरुस्ती करता येणार आहे. निवडणूक आयोगाच्या https://eci.gov.in या संकेतस्थळावर किंवा वोटर हेल्पलाईन ॲप (Voter helpline App) याव्दारे ऑनलाईन पध्दतीने मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे विशेष मोहीम दिनी समक्ष अर्ज करुन आपल्या नावाची नोंदणी करता येणार असल्याचेही डॉ. खिलारी यांनी कळविले आहे.