no images were found
हर घर तिरंगा म्हणजेच घरोघरी तिरंगा अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करा – अमोल येडगे
कोल्हापूर : संपूर्ण देशात हर घर तिरंगा ही मोहिम गेले दोन वर्ष लोक चळवळ बनली असून याही वर्षी हर घर तिरंगा अभियान उत्साहाने राबवून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करा असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले. याबाबत त्यांनी सर्व तालुका तसेच जिल्हा प्रशासनातील विभाग प्रमुखांची बैठक घेवून निर्देश दिले. ते म्हणाले, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. महाराष्ट्र राज्यानेदेखील या अभियानात लक्षवेधी कामगिरी केली आहे. आता याही वर्षी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दि.9 ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा अभियान राबविण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार ग्रामपंचायत, महापालिका आणि जिल्हास्तरावर मोठ्या प्रमाणात विविध उपक्रम आयोजित करून या अभियानाला कोल्हापूर जिल्ह्यात चांगल्या प्रकारे राबवा असे आवाहनही त्यांनी बैठकीत केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, तहसिलदार तथा करमणूक कर अधिकारी सैपन नदाफ, नगरप्रशासन अधिकारी नागेंद्र मुतकेकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अरूण जाधव, उपायुक्त मनपा साधना पाटील तसेच इतर जिल्हास्तरीय विभाग प्रमुख उपस्थित होते तर ऑनलाईन स्वरूपात सर्व तालुका प्रशासन अधिकारी यात तहसिलदार, प्रांत, गट विकास अधिकारी, मुख्याधिकारी उपस्थित होते.
प्रत्येक तालुक्यात दि.9 ते 15 ऑगस्ट दरम्यान शासनाच्या सूचनांनुसार चांगले नियोजन करून सर्व गावे, वाड्या तसेच प्रभागांमध्ये जनजागृती करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी येडगे यांनी दिल्या. दि.9 ते 15 ऑगस्ट दरम्यान तिरंगा यात्रा, रॅली, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम, तिरंगा कॅनव्हॉस, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा सेल्फीज, तिरंगा ट्रिब्यूट व तिरंगा मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. विशेष करून घरोघरी तिरंगा सन्मानाने सर्वांनी लावावा यासाठी विशेष जनजागृती करण्यात येणार आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तिरंगा उपलब्ध असल्याची माहिती तहसीलदार तथा करमणूक कर अधिकारी सैपन नदाफ यांनी दिली. जर कुठे याबाबत अडचणी येत असतील तर तातडीने तिरंगा उपलब्ध करून देण्यासाठी कळवा अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑगस्ट क्रांती मैदानावर दि.9 ऑगस्ट रोजी या अभियानाची राज्यस्तरावर सुरूवात होणार आहे. यानंतर सर्व राज्यात प्रत्येक गावागावाज वेगवेगळ्या कार्यक्रमांना सुरूवात होणार आहे. घरोघरी तिरंगा अभियानात प्रत्येक घरावर दिनाकं 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान ध्वज फडकविण्यात येणार आहे. याही वेळी प्रत्येकाला आपली तिरंगा सोबत काढलेली सेल्फी शासनाने तयार केलेल्या संकेतस्थळ https://www.harghartiranga.com/ वर उपलोड करावयाची आहे. प्रत्येक गाव, शहरांमध्ये ध्वज उपलब्ध करून देण्याबाबत ग्राम विकास विभाग व नगर विकास विभाग समन्वय साधतील. यामध्ये पोस्ट ऑफिस, खादी ग्रामोद्योग, खाजगी आस्थापना, महिला बचत गट, स्वयंसेवी संस्था यांचा सहभाग असेल. सर्व प्रकारची शासकीय निमशासकीय कार्यालये, आस्थापना, प्रतिष्ठाने यांनीही या उपक्रमात सहभागी होणे अपेक्षित आहे. नागिरकानी स्वतः तिरंगा ध्वज खरेदी करून आपल्या घरावर फडकवणे अपेक्षित आहे अशी माहिती या बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली.