no images were found
रिव्हर्स घेताना वडिलांनीच मुलाला टेम्पोखाली चिरडले
पुणे : चाकण (जि. पुणे) येथे ट्रक रिव्हर्स घेतानाच एका चार वर्षांच्या मुलाचे वडील ट्रक चालकाचा मुलगा मागे उभा होता; त्याला ट्रकचा धक्का लागला आणि तो खाली पडून ट्रकच्या चाकाखाली चिरडला गेला. या नकळतपणे घडलेल्या दुर्दैवी अपघातात ट्रक चालकाचा मुलगा अतुल निशाद (वय ४ वर्षे) हा गंभीर जखमी होऊन मृत पावला.
घराबाहेरच उभा असलेला मिनी ट्रक रिव्हर्स घेण्यासाठी अतुलचे वडील गाडीत बसले. त्यांनी ट्रक रिव्हर्स घेण्यास सुरुवात केली. अतुल ट्रकच्या मागील बाजूस होता. याचवेळेस अतुलला मिनीट्रकचा धक्का बसला. त्यामुळे तो खाली कोसळला. त्याचबरोबर अतुलच्या अंगावर मिनी ट्रकचे चाक गेले. चाकाखाली येऊन चिरडल्यामुले चार वर्षांचा अतुल गंभीर जखमी होऊन मृत पावला.
चाकण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मेदनकरवाडी येथे ही दुर्दैवी घटना घडली असून अपघातप्रकरणी पोलिसांनी अतुलच्या वडिलांवर गुन्हा दाखल करुन घेतला आहे. निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे. छोट्याश्या चुकीमुळे ४ वर्षांच्या अतुलला जीव गमवावा लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.