no images were found
महाराष्ट्रात देशातील महामार्गावरील सर्वात उंच केबल-स्टेड ब्रिज बनणार
मुंबई : भारतातील सर्वात उंच केबल-स्टेड रोड ब्रिज महाराष्ट्रात बांधला जात आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग मिसिंग लिंक प्रकल्पातील पायाभूतसुविधा क्षेत्रातील प्रमुख कंपनी अफकॉन्सद्वारे हा १३२ मीटर उंच पूल बांधला जात आहे.
सध्या अस्तित्वात असलेल्या मुंबई पुणे द्रुतगती मार्गाची खोपोली एक्झिट ते सिंहगड इन्स्टिट्यूटपर्यंतची लांबी सुमारे १९ किलोमीटर आहे. मिसिंग लिंक प्रकल्प खंडाळा घाट विभागाला बायपास करेल त्यामुळे एक्सप्रेसवेचे अंतर सहा किलोमीटरहून कमी होईल आणि २५ मिनिटांहून अधिक प्रवासाचा वेळ वाचेल.
महामार्गावरील सर्वात उंच केबल-स्टेड ब्रिज
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे मिसिंग लिंक प्रकल्प दोन पॅकेजमध्ये विभागलेला आहे. अफकॉन्स पॅकेज-दोन चे काम करत असून यात विद्यमान द्रुतगती मार्गाचे सहा लेनवरून आठ लेनपर्यंत रुंदीकरण, दोन व्हायाडक्ट (उड्डाणपूल), त्यापैकी एका व्हायाडक्टमध्ये केबल-स्टेड ब्रिज, यासह इतर कामांचा समावेश आहे. सुमारे ८५० मीटर लांबीच्या व्हायाडक्ट-I साठी फाउंडेशनचे पूर्ण झाले आहे आणि प्री-टेन्शन गर्डर्स आणि डेक पॅनेलचे लॉन्चिंग प्रगतीपथावर आहे. व्हायाडक्ट -II, जेथे केबल-स्टेड पूल बांधला जात आहे तो सुमारे ६५० मीटर लांब आहे. हा पूल जमिनीपासून १३२ मीटर उंचीवर असेल जो देशातील कोणत्याही रस्ते प्रकल्पामधील सर्वात उंच असेल.
“सध्या, व्हायाडक्ट-II मध्ये फाउंडेशन, पिलर आणि पायलॉन (केबल स्टेड ब्रिज पिलर) बांधण्याचे काम सुरू आहे. या व्हायाडक्टमधील सर्वात उंच पायलॉन जमिनीच्या पातळीपासून १८२ मीटर असेल आणि हा भारतातील कोणत्याही कोणत्याही रस्ते प्रकल्पातील सार्वधिक उंच असेल,” असे अफकॉन्सचे प्रकल्प व्यवस्थापक रणजित झा यांनी सांगितले. त्याचसोबत खंडाळा घाट हा भूस्खलन आणि अपघातप्रवण भाग आहे. नवीन लिंकरोडमुळे अपघात कमी होण्यासोबतच इंधन कार्यक्षमता सुधारण्यास आणि वायूचे उत्सर्जन कमी होण्यास मदत होईल असंही त्यांनी म्हटलं. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे मिसिंग लिंक प्रकल्पाच्या पॅकेज-II चे काम २०१९ मध्ये सुरू झाले आणि ते २०२४ मध्ये पूर्ण होईल.