Home Uncategorized अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

1 min read
0
0
23

no images were found

अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

 

  

            मुंबई : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य जगभर प्रसिद्ध असून त्यांचा वाटेगाव ते मॉस्को प्रवास आहे. तो उल्लेखनीय असून त्यांच्या साहित्यातून समाजात क्रांतिकारी परिवर्तन घडले आहे. त्यांचे साहित्य वीस पेक्षा अधिक भाषेत अनुवादित झाले असून त्यांचे साहित्य जगण्यासाठी लढणाऱ्या माणसांसाठी दीपस्तंभासारखे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

            अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) कार्यालयाचे उद्घाटन आज मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच वेबसाईट, पोर्टल व सहज शिक्षा अॅपचे उद्घाटन ही यावेळी करण्यात आले. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.

            या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, आमदार अमित गोरखे, सामाजिक न्याय विभागाचे सचिव विजय वाघमारे, सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, आर्टी चे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष सांगळे आदी उपस्थित आहेत.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने शिष्यवृत्ती किंवा कर्ज मिळणे ही आर्थिक जबाबदारी नसून ती सामजिक जबाबदारीची जाणीव आहे. हे भान युवकांनी ठेवले पाहिजे. बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थांच्या धर्तीवर आर्टी ही संस्था उत्तम काम करेल, युवकांना मार्गदर्शन करेल. असा मला विश्वास आहे.राज्यातील महिला, मुली, युवक व ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाने अनेक नवीन योजना आणल्या आहेत. ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेचे दोन हप्ते हे रक्षाबंधनच्या पूर्वीच महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत.अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तीन गॅस सिलिंडर मोफत देण्यात येणार आहेत. तसेच राज्यातील मुलींना उच्च शिक्षणामध्ये कोणतीही अडचण येऊ नये यासाठी फी सवलत देण्यात आली आहे. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत युवकांना अनुदान मिळणार आहे. यात बारावी, पदवी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुदान देणारे महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य आहे. दिव्यांगासाठी स्वतंत्र विभाग आपण राज्यांमध्ये निर्माण केला असून दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय निर्माण करणार महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी  सांगितले.

अण्णा भाऊ साठे यांचे व्यक्तिमत्व वैश्विक -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आपण आर्टीची सुरुवात करीत आहोत हा एक राज्यात एक सामाजिक चळवळीचा महत्त्वाचा टप्पा आहे. अण्णा भाऊ साठे यांचा रशियातील पुतळ्याच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी रशियात गेलो तेव्हा अण्णा भाऊ साठे यांचे विचार ऐकल्यानंतर अभिमान वाटला. ही आठवण त्यांनी यावेळी सांगितली.अण्णाभाऊ साठे यांनी  मराठी भाषा, मराठी साहित्य हे साता समुद्रा पार पोहोचवले असून त्यांचे व्यक्तिमत्व वैश्विक आहे.

            मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी लहुजी वस्ताद साळवे आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी शासन सकारात्मक आहे. वस्ताद लहुजी साळवे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले आहे.या ठिकाणी आर्टीच्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह सुरू करण्यात येईल. आर्टी संस्थेच्या माध्यमातून उच्च शिक्षण, स्टार्ट अप,रोजगार यासाठी विविध प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या संस्थेच्या माध्यमातून मातंग समाजातील जास्तीत जास्त विद्यार्थी आयएएस, आयपीएस अधिकारी होतील, असा विश्वास आहे. मानव संसाधन निर्मिती करणारा हा समाज असून या समाजाच्या विकासासाठी शासन नेहमीच पाठिशी आहे,असे उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले.

अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकासाठी पुरेसा निधी -उपमुख्यमंत्री अजित पवार

            अण्णा भाऊ साठे यांनी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी समाजाच्या उद्धारासाठी जे उत्तुंग कार्य केले आहे ते कधीही विसरता येणार नाही. घाटकोपरमधील चिरागनगर येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे भव्य स्मारक लवकरच उभारण्यात येईल.या स्मारकासाठी तसेच समाजाच्या विकासासाठी  पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री श्री. पवार  म्हणाले.

             विविध विभागाची वसतीगृहे, आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचे  परिपोषण अनुदानात भरीव वाढ केली आहे. अनुदानित संस्थामधील विद्यार्थ्यांच्या आहारावर पूर्वी प्रति विद्यार्थी 1500 रुपये महिना इतके होते ते आता 2200 रुपये प्रति महिना इतके असेल.याचा लाभ मागासवर्गीय, वंचित अशा 5 लाख विद्यार्थ्यांना होणार आहे. आर्टी संस्थेच्या माध्यमातून आपल्या समाजाचा सर्वांगीण विकास होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी व्यक्त केला.

            मंत्री श्री. देसाई म्हणाले, बार्टी  या संस्थेच्या धर्तीवर आर्टीची स्थापना करण्याची मातंग समाजाची मागणी आज शासनाने पूर्ण केली आहे. आर्टी कार्यालयाच्या उद्घाटनामुळे आता संस्थेच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक न्याय विभागाचे सचिव विजय वाघमारे यांनी केले. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शैक्षणिक कर्ज व लाभार्थ्यांना विविध योजनेअंतर्गत कर्जाचे धनादेश वितरण करण्यात आले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…