no images were found
कोल्हापूर इनक्युबेशन सेंटर येथे इमिटेशन ज्वेलरी कार्यशाळा संपन्न
कोल्हापूर ( प्रतिनिधी):-‘मिशन रोजगार’ उपक्रमाद्वारे महिलांना स्वतःचे उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक कौशल्य आणि संसाधने उपलब्ध झाली आहेत. इमिटेशन ज्वेलरी कार्यशाळेमुळे महिलांना आर्थिक स्वावलंबी बनण्यास मदत होईल, असा विश्वास सौ. पूजा ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केला. कोल्हापूर इनक्युबेशन सेंटर येथे आयोजित इमिटेशन ज्वेलरी कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या.
आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ‘मिशन रोजगार’ अंतगर्त महिलांना स्वयंपूर्ण बनवण्याच्या दिशेने विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. या अंतर्गत डॉ. डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग साळोखे नगर कॅम्पस येथील कोल्हापूर इनक्युबेशन सेंटर इमिटेशन ज्वेलरी कार्यशाळा संपन्न झाली.
सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग विभाग व जेम्स अँड ज्वेलरी सेक्टर स्किल कौन्सिल यांच्या रॅम्प योजने अंतर्गत आयोजित या कार्यशाळेत 70 महिलांनी सहभाग घेतला. या कार्यशाळेत कोल्हापुरी साज, फ्लावर ज्वेलरी, बुगडी, नथ, क्रिस्टल ज्वेलरी, कुंदन ज्वेलरी बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणानंतर सर्व सहभागी महिलांना शासकीय प्रमाणपत्र आणि मोफत उद्योग आधारची नोंदणीही देण्यात आली. सौ. पूजा ऋतुराज पाटील यांच्या हस्ते सहभागी महिलांना प्रमाणपत्र आणि उद्योग आधार नोंदणीचे प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना पाटील म्हणाल्या, महिलाना स्वावलंबी बनविण्यासाठी मिशन रोजगार कार्यरत आहे. यामाध्यामातून महिलान विविध कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते. आजपर्यंत शेकडो महिलांनी ‘मिशन रोजगार’ च्या माध्यमातून स्वत:चे व्यवसाय सुरु केले आहेत. आज येथे आयोजित केलेल्या इमिटेशन ज्वेलरी कार्यशाळेमुळे महिलांना आर्थिक स्वावलंबी बनण्यास नक्कीच मदत होईल.यावेळी कॅम्पस डायरेक्टर डॉ. अभिजीत माने, राजन डांगरे यांच्यासह प्रशिक्षक उपस्थित होते.
.