no images were found
राज्यात केंद्र पुरस्कृत फ्लॅगशीप योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी : मनुकुमार श्रीवास्तव
सर्व जिल्ह्यांनी पी.एम. किसान योजनेचा अद्यावत डाटा 30 सप्टेंबर पर्यंत अपलोड करावा
कोल्हापूर :- राज्यातील सर्व जिल्हा प्रशासनाने केंद्र पुरस्कृत फ्लॅगशिप योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी अधिक गतीने काम करावे, असे आवाहन राज्याचे मुख्य सचिव मनूकुमार श्रीवास्तव यांनी केले आहे.
मुंबई येथून दूरदृश्यप्रणालीद्वारे केंद्र पुरस्कृत फ्लॅगशिप योजनांचा आढावा प्रसंगी श्रीवास्तव मार्गदर्शन करत होते. कोल्हापूर येथून जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक गणेश गोडसे यांच्यासह अन्य विभाग प्रमुख उपस्थित होते.
श्रीवास्तव पुढे म्हणाले की, पी एम किसान योजनेचा लाभ संबंधित पात्र शेतकरी लाभार्थ्यांना मिळण्यासाठी भूमी अभिलेख नोंदीप्रमाणे डाटा अपलोड करण्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी यांनी स्वतः लक्ष घालावे. प्रत्येक जिल्ह्याने त्यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणाची तपासणी व्यवस्थित करून घ्यावी व संबंधित शेतकरी त्या गावात आथवा तालुक्यात मिळून येत नसेल तर त्यांची अत्यंत दक्षपणे चौकशी करूनच नावे वगळण्याची कार्यवाही करावी. एक ही पात्र लाभार्थी डेटा अपलोड करण्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता संबंधित जिल्हा प्रशासनाने घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी सुचित केले.
पी एम किसान योजनेत पात्र लाभार्थ्यांच्या माहितीचे अद्यावतीकरण सर्व जिल्ह्यांनी 30 सप्टेंबर अखेर पूर्ण केले पाहिजे. केंद्र शासनाकडून लवकरच या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना बारावा हप्ता वितरित करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येणार असल्याने याबाबत संबंधित जिल्हा प्रशासनाने अत्यंत गांभीर्यपूर्वक हे काम वरील मुदतीत पूर्ण करावे, असे निर्देश श्रीवास्तव यांनी दिले आहेत .
किसान क्रेडिट कार्डचा लाभ संबंधित पात्र शेतकऱ्यांना देण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालावे व जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यांच्या माध्यमातून सर्व बँकांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावून क्रेडिट कार्ड वितरित करण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करावी. तसेच आयुष्यमान भारत योजनेअंतर्गतचे कार्ड वितरित करण्यासाठी संयुक्त कॅम्प लावण्याबाबतची सूचनाही मुख्य सचिव श्रीवास्तव यांनी केली. सेवा पंधरवडा अंतर्गत प्रत्येक जिल्ह्याचे काम सेवा पंधरवड्यात पूर्ण होण्यासाठी सर्वांनी सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.
पी. एम. किसान योजनेत देश पातळीवर राज्याचा ऑनलाईन माहिती भरण्यात आठवा क्रमांक असून अजून पर्यंत एकोणीस लाख शेतकऱ्यांचा डाटा भरावयाचा आहे. तरी प्रत्येक जिल्ह्याने त्यांच्याकडे प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांची माहिती घेऊन त्वरित डाटा अपलोड करावा. या योजनेत आत्तापर्यंत अकरा हफ्ते वितरित करण्यात आलेले असून एखाद्या शेतकरी अपात्र ठरवत असताना त्याबाबत अत्यंत दक्षपणे चौकशी करावी. पूर्ण खात्री झाल्यानंतरच अपात्रतेची कारवाई करावी. एक ही पात्र शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही अशा सूचना कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी केल्या. आयकर रिटर्न फॉर्म भरत असेल तर त्या शेतकऱ्याला योजनेच्या लाभापासून वंचित ठेवता येणार नाही. प्रत्यक्ष आयकर भरणा करत असेल असाच शेतकरी अपात्र ठरेल असे त्यांनी सांगितले.