
no images were found
काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यास गेहलोत नकार
काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नसल्याचे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी स्पष्ट केले आहे. नवी दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी हे स्पष्ट केले आहे. यावेळी त्यांनी आपण कालच्या प्रकाराबद्दल माफी मागितल्याचेही सांगितले.
गेहलोत म्हणाले की, मी मुख्यमंत्री राहिल की नाही हे मला माहीत नाही. याचा निर्णय सोनिया गांधी घेतील असे गेहलोत म्हणाले की, कोचीमध्ये राहुल गांधींना भेटलो आणि त्यांना काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढण्याची विनंती केली होती. त्यावेळी त्यांनी याला नकार दिला. त्यावेळी ही निवडणूक मी लढेन असे त्यांना सांगितले होते. मात्र, राजस्थानमधील घडामोडी लक्षात घेता मी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे अशोक गहलोत यांनी स्पष्ट केले आहे.
काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या या निवडणुकीसाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह उमेदवारी अर्ज भरण्याच्या तयारीत असतानाच अशोक गेहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक न लढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण? असणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तर दुसरीकडे लोकसभा सदस्य शशी थरूर 30 सप्टेंबर रोजी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे आता शशि थरूर आणि दिग्विजय सिंह यांच्यापैकी कोण अध्यक्ष होणार हे पाहावे लागणार आहे.