no images were found
रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन आणि भागीरथी संस्थेच्यावतीने वळिवडेतील शाळेत कळी उमलताना या कार्यक्रमाचे आयोजन
कोल्हापूर ( प्रतिनिधी):-आरोग्य संवर्धनासाठी नियमित व्यायाम आणि सकस पौष्टिक आहार घेतला पाहिजे. स्त्रीयांनी कुटुंबाची काळजी घेताना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे, विशेषतः वयात येणार्या तरूणींनी आरोग्याबद्दल अधिक जागरूक असले पाहीजे, असे मत रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनचे सेक्रेटरी बाळकृष्ण शिंपूगडे यांनी व्यक्त केले. वळीवडे इथं आयोजित कळी उमलताना कार्यक्रमात ते बोलत होते.
करवीर तालुक्यातील वळीवडे इथल्या शाळेत, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन आणि भागीरथी महिला संस्थेच्या वतीने, कळी उमलताना या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रोटरीचे सेक्रेटरी बाळासाहेब शिंपूगडे यांनी आरोग्य रक्षणाबद्दल जनजागृती महत्वाची असल्याचे सांगत, नियमित व्यायाम आणि सकस पौष्टिक आहार घ्यावा, असे आवाहन केले. भागीरथी संस्थेने शालेय विद्यार्थिनींना आरोग्याबद्दल जागरूक बनवले आहे. कुटुंबाचे आरोग्य जपताना महिलांनी स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. प्राध्यापक डॉक्टर रूपा कुलकर्णी यांनी तरूण वयात होणार्या शारिरीक बदलांबद्दल माहिती देवून, परिपूर्ण स्त्री बनताना, मुलींनी शारीरिक बदलांना आनंदाने आणि आत्मविश्वासाने सामोरे जावे, असे सांगितले. यावेळी प्राध्यापक कुलकर्णी यांनी मुलींच्या आरोग्य विषयक प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. मुख्याध्यापक मनोहर पवार, शिक्षक प्रदीप पाटील, भाजपाच्या सुलोचना नार्वेकर, राजगोंडा झुणके यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला प्रतिभा शिंपूगडे, विजयालक्ष्मी संबरगी, विजय खांडेकर, सारिका पोवार, संगीता पंढरे, जयश्री पोवार, मनीषा ठोंबरे, अर्पिता खांडेकर, नीलम साळोखे यांच्यासह विद्यार्थिनी आणि पालक उपस्थित होते. दरम्यान शाळेच्या वतीनं सर्व मान्यवरांना वृक्ष आणि ग्रंथ भेट देण्यात आली. तर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.