no images were found
शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी योगा महत्त्वाचा – अमोल येडगे
कोल्हापूर: जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिवस जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ, प्रांताधिकारी हरीश धार्मिक, सहायक आयुक्त कौशल्य विकास संजय माळी, नगर प्रशासन अधिकारी नागेंद्र मुतकेकर, सहायक आयुक्त समाज कल्याण सचिन साळे, तहसिलदार सैफन नदाफ, आशा होळकर, सुरेखा दिवटे, वनिता पवार, तालुका क्रीडा अधिकारी सचिन चव्हाण, क्रीडा अधिकारी सुधाकर जमादार, अरुण पाटील, मनीषा पाटील, रोहिणी मोकाशी, क्रीडा मार्गदर्शक प्रवीण कोंढवळे, रविभूषण कुमठेकर यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी, एस्तेर पॅटर्न हायस्कूल, दादासाहेब मगदूम हायस्कूल या विद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सकाळी ७.०० ते ८.०० वाजेदरम्यान सामूहिक योगा कार्यक्रमाअंतर्गत प्रार्थना, खडे आसने, बैठी आसने, पोटावर व पाठीवर झोपून आसने, प्राणायम, ध्यान, शांतिपाठ इत्यादी योग क्रिया घेण्यात आल्या. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. तसेच ॐ प्रतिमेचे पूजन करुन प्रार्थना झाली.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी योग दिनाच्या सर्व जिल्हावासियांना शुभेच्छा देऊन उपस्थितांचे आभार मानले. योग दिनानिमित्त प्रात्यक्षिके सादर केल्याबद्दल सहभागी खेळाडू आणि विद्यार्थ्यांचे त्यांनी कौतुक केले. योगा करण्याचा संकल्प चांगला असून शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी योगा महत्वाचा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
योग प्रशिक्षक रविभूषण कुमठेकर यांनी उपस्थितांना योगाविषयी माहिती दिली. व्यासपीठावर क्रीडा विभागाचे खेळाडू विद्यार्थ्यांनी योग प्रात्यक्षिके करुन दाखविली व त्यानुसार उपस्थितांनी सर्व आसनांची प्रात्यक्षिके केली. योग प्रात्यक्षिके करण्यासाठी विविध शाळांनीही सहभाग घेतला होता. सूत्रसंचालन शिवाजी पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन क्रीडा अधिकारी अरुण पाटील यांनी मानले. मलबार ज्वेलर्स अँड डायमंड यांनी सर्व उपस्थितांना खाऊ वाटप केले.